
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईसह विविध समस्यांवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या पाच कृती गटांनी सुचविलेल्या उपाययोजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. टंचाई आराखड्याची वेगवेगळ्या टप्प्यांत अंमलबजावणी करताना नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आणि प्राधान्याच्या कामांना प्रथम हाती घ्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दुष्काळ टास्क फोर्सच्या बैठकीत पालकमंत्री राणे यांनी जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, संभाव्य पाणीटंचाई आणि आगामी काळातील उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आपत्ती व्यवस्थापनांतर्गत स्थापन केलेल्या पाच कृती गटांच्या कामकाजाची तसेच त्यांनी सादर केलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी पालकमंत्र्यांना दिली.
बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासूर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष दादा साईल, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
फेब्रुवारी-मार्चनंतरही जिल्ह्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी आतापासूनच नियोजनबद्ध पद्धतीने कामे हाती घेण्याची आवश्यकता पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. पाणीटंचाई निवारणासाठी आवश्यक असलेल्या कामांचे प्राधान्यक्रम निश्चित करून त्यानुसार अंमलबजावणी करावी असे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक कृती गटामध्ये अशासकीय सदस्यांचाही समावेश करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी स्थापन करण्यात आलेल्या पाच कृती गटांमध्ये टंचाई काळातील पाणीपुरवठा व्यवस्थापन, चारा व्यवस्थापन, रोजगार हमी व तत्सम कामे, सिंधुदुर्गनगरीतील पाणीटंचाई निवारण व उपाययोजना आणि वन्यजीव व्यवस्थापन या विषयांचा समावेश आहे. या प्रत्येक गटाने संबंधित विषयांतील संभाव्य अडचणींचा अभ्यास करून आवश्यक उपाययोजना आणि त्यासाठी लागणाऱ्या निधीबाबत प्रस्ताव सादर केले आहेत. या प्रस्तावांनुसार तातडीने राबविण्यात येणाऱ्या टंचाई निवारणाच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे पालकमंत्री राणे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील पाणीटंचाईचे आव्हान लक्षात घेऊन पाणीपुरवठ्याचे स्रोत बळकट करणे, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे, जनावरांसाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करणे तसेच रोजगार हमीच्या माध्यमातून आवश्यक कामांना चालना देणे, या बाबींवर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित करावे, असेही यावेळी निर्देशित करण्यात आले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








