
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जहाज बांधणी उद्योग आणि बंदर विकासाच्या माध्यमातून भविष्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. या संधींचा लाभ जिल्ह्यातील युवक-युवतींना मिळावा, यासाठी स्थानिक पातळीवर कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) ‘मरीन इंजिन फिटर’ आणि ‘मरीन फिटर’ हे दोन नवीन ट्रेड सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करावेत, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिकारी प्रतिभा चव्हाण, भूषण सोनवडेकर आदी उपस्थित होते.
जहाज बांधणी आणि बंदर विकासाशी संबंधित उद्योगांना मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. ही गरज लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये हे दोन्ही अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन करावे. त्यासाठी आवश्यक शासन मान्यता मिळविण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या.
जिल्ह्यातील दहावी उत्तीर्ण युवक-युवतींना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण स्थानिक पातळीवरच उपलब्ध झाले पाहिजे. जिल्ह्यातील आठ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून याच वर्षी हे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पाठपुरावा करावा, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
या अभ्यासक्रमांमधून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या युवक-युवतींना खासगी व सरकारी शिपयार्ड, बंदरे, मर्चंट नेव्ही, ऑइल आणि गॅस प्रकल्प अशा विविध सागरी व औद्योगिक क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे जिल्ह्यातील युवकांना भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी आतापासूनच प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीने हे अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
याशिवाय जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी पर्यटन क्षेत्राशी संबंधित विविध अल्पमुदतीचे (शॉर्ट टर्म) कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतही पालकमंत्र्यांनी सूचना केल्या. पर्यटन क्षेत्रातील रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ स्थानिक युवकांना मिळण्यासाठी त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात इलेक्ट्रिशियन या व्यवसायातील प्रशिक्षित मनुष्यबळाचीही गरज असून, त्यासाठी आणखी काही औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








