LIVE UPDATES

दहावीच्या परीक्षेत ‘कॉपी? शिक्षकांने लिहिली पुरवणी?

त्या विध्यार्थ्याचा रिजल्ट थांबावीला
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: May 19, 2026 22:05 PM
views 83  views

सिंधुदुर्गनगरी : मार्च २०२६ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, एका विद्यार्थ्यांची पुरवणी चक्क शिक्षकाने लिहून दिल्याचे उघड झाले आहे.  या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून कोकण बोर्डालाही या प्रकरणाची थेट दखल घ्यावी लागली आहे.

      विशेष म्हणजे, हा प्रकार साध्या कॉपीपुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका शिक्षकांनी स्वतः लिहिल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे “निकालासाठी काहीही” अशी विकृत मानसिकता शिक्षण व्यवस्थेत किती खोलवर रुजली आहे, याचे भयावह चित्र समोर आले आहे.

        मिळालेल्या माहितीनुसार, वैभववाडी तालुक्यातील एका परीक्षा केंद्रातील उत्तरपत्रिका तपासणीसाठी गेल्यानंतर एका पेपर तपासणाऱ्या शिक्षकाच्या  लक्षात ही धक्कादायक बाब आली. एका विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेच्या पुरवणी मधील अक्षर आणि मूळ उत्तर पत्रिकेतील अक्षर यामध्ये बरीच तफावत होती.

     या प्रकाराची गंभीरता ओळखून संबंधित शिक्षकाने थेट कोकण विभागीय शिक्षण मंडळाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर बोर्डाने स्वतंत्र प्राथमिक चौकशी केली असता आरोपांमध्ये तथ्य आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोकण बोर्डाने सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाला सखोल चौकशीचे आदेश दिले होते या चौकशीत संबंधित विद्यार्थ्यांचे पुरवणी उत्तर पत्रिका एका शिक्षकाने लिहिलेले उघड झाले आहे.

        या चौकशीची जबाबदारी उपशिक्षणाधिकारी संजय माने यांच्याकडे सोपविण्यात आली असून त्यांनी संबंधित केंद्र, उत्तरपत्रिका, पर्यवेक्षक आणि संबंधित शिक्षकांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. काही उत्तरपत्रिका तज्ज्ञांकडून हस्ताक्षर पडताळणीसाठीही पाठवल्या जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

         दरम्यान, या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. मेहनत घेऊन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांवर अशा प्रकारामुळे पाणी फिरत असल्याची भावना व्यक्त होत आहे. निकालाची टक्केवारी वाढविण्यासाठी आणि शाळेचा लौकिक टिकवण्यासाठी काही जणांनी शिक्षणाची पवित्रताच गहाण ठेवल्याची टीका होत आहे.

             या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर भविष्यात अशा प्रकारांना अधिक खतपाणी मिळेल, अशी भीती शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. त्यामुळे चौकशी केवळ कागदोपत्री न राहता संबंधितांवर फौजदारी कारवाईपर्यंत जावी, अशी मागणीही पुढे येत आहे.

       कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी यावर्षी बोर्डाने विशेष अभियान राबविले. मुख्यमंत्री स्तरावरून यासाठी खास उपाययोजना राबविल्या गेल्या. त्याला मोठ्या प्रमाणात यश सुद्धा आले. मात्र, त्याचवेळी शिक्षकच पेपर लिहून देत असल्याचे पुढे आल्याने कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा फायदा काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

     या प्रकरणात त्या शिक्षकाने लिहिलेले पेपर संबंधित विद्यार्थ्याने एक अक्षर सुद्धा लिहिलेले नाही. परीक्षेची वेळ संपली की ताबडतोप पेपर जमा केले जातात. बोर्डाच्या स्वाधीन हे पेपर होतात. मग त्या शिक्षकाने पेपर लिहिले कधी ? बोर्डाच्या यंत्रणेतील त्याच्या या बोगसगिरीत कोण सहभागी आहे का ? की परीक्षा सुरू असतानाच त्या विद्यार्थ्याच्या ऐवजी शिक्षक पेपर लिहित होते ? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुले हुशार आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक अलीकडे लागत असलेल्या बोर्डाच्या निकालाबाबत समाधानी आहेत. मात्र त्याचवेळी थेट पेपर लिहून देण्याचे प्रकार समोर आल्याने जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित प्रकार करणारा शिक्षक हा पर जिल्ह्यातील आहे.. केवळ पैशासाठी त्याने हे कृत्य केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणीही व्यक्ती असा प्रकार करणार नाही. मात्र, गुणवत्तेत अव्वल असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोकण बोर्डाच्या नावाला काळा डाग लागण्याची शक्यता आहे. 

 संबंधित विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला आहे : क्षीरसागर 

   याबाबत कोकण बोर्डाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित उत्तर पत्रिका एका शिक्षकांनी लिहिल्याचे निश्चित झाले असून इतर सर्व चौकशी सुरू आहे दरम्यान संबंधित विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला असून त्या शिक्षकासह संबंधी सर्वांवर कडक कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे.