LIVE UPDATES

शेतमांगरातून दोन टन काजू बिया लंपास

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: March 24, 2026 21:26 PM
views 106  views

कणकवली : यंदा काजू पीक अत्‍यल्‍प प्रमाणात आहे. त्‍यात साठवलेला तब्‍बल दोन टन काजू साठा शेतमांगरातून लंपास झाला आहे. सध्या १६० रूपये प्रतिकिलो काजू बियांना दर आहे. त्‍यामुळे तेंडुलकर यांचे ३ लाख २० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. चोरीची घटना २३ मार्च रोजी सायंकाळी ६.३० ते २४ मार्च रोजी सकाळी ८.३० या मुदतीत घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 कोंडये गावातील वरचीवाडी येथे दत्तात्रय विठ्ठल तेंडुलकर आणि विलास विठ्ठल तेंडुलकर यांची सात एकर क्षेत्रात काजू बागायत आहे. या बागायतीमध्ये एक हजार काजूची झाडे आहेत. तसेच पक्‍का चिरेबंदी शेतमांगर देखील बांधण्यात आला आहे. या शेतमांगरामध्ये त्‍यांनी काजू बियांचा साठा करून ठेवला होता. २२ मार्च रोजी  दत्तात्रय तेंडुलकर सकाळी आठ वाजता कामगारांसह काजू बागेत आले होते. दिवसभर त्‍यांनी आणि त्‍यांच्या कामगारांनी काजू बागेतील काजू बिया गोळा केल्‍या आणि शेतमांगरामध्ये साठवून ठेवल्‍या. सायंकाळी साडे सहा वाजता शेतमांगराला कुलूप लावून तेंडुलकर हे कामगारांसह आपल्‍या कोंडये वरचीवाडी येथील घरी गेले होते. 

२३ मार्च रोजी दत्तात्रय तेंडुलकर सकाळी आठ वाजता आपल्‍या कामगारांसह काजू बागेत आले आणि काजू बिया संकलन सुरू केले. सकाळी  साडे आठ वाजण्याच्या सुमारास ते शेतमांगरामध्ये ते शेतीसाहित्‍य आणण्यासाठी आले त्‍यावेळी त्‍यांना शेतमांगराच्या दरवाजाचा कडी कोयंडा  तुटलेला दिसून आला. तर आत जाऊन पाहिले असता मांगरातील दोन टन काजू साठा गायब असल्‍याचे लक्षात आले. त्‍यानंतर श्री.तेंडुलकर यांनी या चोरी प्रकरणी आज कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्‍यानुसार अज्ञाता विरोधात कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पडळकर करत आहेत.