
कणकवली : कलमठ – गुरववाडी येथे काहींकडून ख्रिश्चन धर्मामध्ये अन्य धर्मियांचा व विशेषत: हिंदू धर्मियांचा गैरमार्गाने प्रवेश घेतला जात असल्याचा आरोप करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी तेथे धाव घेतली होती. रविवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी कणकवली पोलीस ठाण्यातही धाव घेतली होती. अखेरीस या प्रकरणी लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक केल्याचा गुन्हा एका दाम्पत्यावर दाखल करण्यात आला आहे. निखील बाबूराव सुतार (२९, रा. जानवली) यांच्या फिर्यादीनुसार, अतुल अशोक भोरे (५२) व त्याची पत्नी उषा अतुल भोरे (४७, दोघेही रा. कलमठ – गुरववाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, अतुल व उषा यांनी निखिल व त्यांच्या कुटुंबियांना ख्रिसमस सणासाठी घरी बोलवले. येशू ख्रिस्ताची प्रार्थना केल्यामुळे मनशांती मिळते, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार निखिल व कुटुंबिय हे भोरे यांच्याकडे प्रार्थनेसाठी जात होते. पुढे ते दर रविवारी जाऊ लागले. निखील यांचे लग्न झालेले नाही. निखिल यांना ख्रिश्चन धर्म स्विकारलेली मुलगी बघून देतो, असे आश्वासन भोरे यांनी दिले. त्यानुसार निखील येशूच्या पुजेला जात राहीले. मात्र, भोरे यांनी त्याला मुलगी बघून दिलेली नाही. तसेच येशूच्या प्रार्थनेसाठी गेल्यानंतर हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रकार भोरे यांनी केला. गुलाबजल असल्याचे सांगून अल्कोहोलयुक्त पाणी पाजले, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.














