वैभववाडी तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट

नाधवडे येथे बंगला फोडून लाखोंचा साहित्य लंपास
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 28, 2026 20:54 PM
views 129  views

वैभववाडी : तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून शहरानंतर आता ग्रामीण भागालाही त्यांनी लक्ष्य केले आहे. नाधवडे येथील शिडवणे मार्गावर असलेला परशुराम ईस्वलकर यांचा बंगला फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांच साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी गुरुवारी (ता.२८) रात्री घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार, ईस्वलकर यांचा बंगला अधूनमधून बंद असतो. गुरुवारीही बंगला बंद असतानाच चोरट्यांनी पुढील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील फ्रीज, इनव्हर्टर, दोन गॅस सिलेंडर, स्टीलची भांडी भरलेली पोती, देवपूजेचे महागडे साहित्य, बाथरूममधील नळ व अन्य साहित्य, तसेच कपड्यांच्या बॅगा असा अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला.

  दरम्यान, एका स्थानिक व्यक्तीला बंगल्याचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी ही माहिती ईस्वलकर यांना दिली. त्यानंतर ते तातडीने घटनास्थळी पोहोचले असता घरातील सर्व दरवाजे उघडे आढळले. तसेच कटावणी, कटर यांसारखी चोरीसाठी वापरलेली साधनेही तेथे दिसून आली.श्री इस्वलकर यांनी ही माहिती पोलिसांना दिली.घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस, स्थानिक गुन्हा अन्वेषण पथक तसेच श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथकाने घराच्या मागील बाजूने रस्त्यापर्यंत माग काढला, मात्र पुढे काही ठोस सुगावा लागला नाही.

  या घटनेमुळे नाधवडे परिसरासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

चोरट्यांची टोळी असण्याची शक्यता..-  शहरात दोन दिवसांपूर्वी दुचाकी चोरीला गेली होती.त्याच दिवशी एका दवाखान्यात चोरीचा प्रयत्न केला गेला होता.त्यानंतर नाधवडे येथे ही घटना घडली आहे.येथील चोरीत टेम्पोभर साहित्य चोरीला गेले आहे. त्यामुळे या चोरीच्या घटनांमध्ये एखादी टोळी असण्याची शक्यता आहे.याचा छडा लावण्यात पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे.