LIVE UPDATES

गोवर्धन पर्वताच्या देखाव्याने मिठबावात गोकुळाष्टमीचा उत्साह

रामेश्वर मंदिरात भक्तीमय वातावरण
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 05, 2026 20:25 PM
views 18  views

देवगड : ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात गोकुळाष्टमी उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सात प्रहरांचा हरिनाम सोहळा, श्रीकृष्ण जन्मोत्सव, भव्य मिरवणूक तसेच गोवर्धन पर्वताचा आकर्षक चलतचित्र देखावा यामुळे मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण राहिले.

उत्सवानिमित्त सकाळी घटस्थापना व श्रींचे पूजन करून सात प्रहरांच्या हरिनाम सोहळ्याला सुरुवात झाली. हरिनामाच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमून गेला. बारा-पाच मानकरी, देवसेवक तसेच गावघर गाव रयत आणि भाविकांनी या धार्मिक सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

सायंकाळी श्री नाडकर्णी यांच्या घरातून श्रीकृष्णाची मूर्ती वाजतगाजत मिरवणुकीने श्री देव रामेश्वर मंदिरात आणण्यात आली. त्यानंतर सांज महाआरती व श्रीकृष्ण मूर्तीपूजा भक्तिभावाने पार पडली.

रात्री श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त मिठबाव पंचक्रोशीतील स्थानिक तरुण मंडळींनी साकारलेला श्रीकृष्णाने उचललेल्या गोवर्धन पर्वताचा आकर्षक चलतचित्र देखावा उत्सवाचे विशेष आकर्षण ठरला. देखाव्यातून गोवर्धनधारणेचा प्रसंग प्रभावीपणे साकारण्यात आला. हा देखावा पाहण्यासाठी ग्रामस्थांसह भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी भव्य ढोलपथक, दिंडीपथक आणि फटाक्यांच्या आतषबाजीसह मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर आणि श्रीकृष्णाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवारी पहाटे काकड आरती झाल्यानंतर दुपारी गोपाळकाला अर्थात दहीकाला उत्साहात पार पडला. त्यानंतर उत्सवाची सांगता झाली. तसेच रविवारी समाराधनेचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री देव रामेश्वर देवस्थान समितीच्या नियोजनातून तसेच मानकरी, देवसेवक, स्थानिक तरुण मंडळी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने हा उत्सव उत्साहात पार पडला. पारंपरिक धार्मिक विधींसोबतच स्थानिक तरुणांनी साकारलेल्या आकर्षक देखाव्यामुळे यंदाच्या गोकुळाष्टमी उत्सवाला विशेष रंगत आली.