LIVE UPDATES

‘संस्कार नॅशनल स्कूल’मध्ये जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा थरार

एमसीसी सावंतवाडी संघाने पटकावले विजेतेपद
Edited by: विनायक गांवस
Published on: June 11, 2026 11:21 AM
views 41  views

सावंतवाडी : सावंतवाडी येथील नामांकित ‘संस्कार नॅशनल स्कूल’ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६ चे उद्घाटन नुकतेच अत्यंत उत्साही, भव्य आणि क्रीडामय वातावरणात संपन्न झाले. या स्पर्धेला जिल्ह्यातील खेळाडू आणि क्रीडाप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा प्रमुख पाहुणे आणि संस्थेचे अध्यक्ष शेखर जैन यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत क्रीडा क्षेत्रातील शिस्तीचे आणि कौशल्याचे महत्त्व अधोरेखित केले. स्पर्धा समन्वयक अजय वामन बांदेकर यांनी स्पर्धेचे  नियोजन केले होते. या जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक नामांकित संघांनी सहभाग घेतला होता. सर्वच सामने अत्यंत चुरशीचे आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले. अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत एमसीसी सावंतवाडी संघाने प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावले. तर जय माणसेश्वर संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. उपविजेत्या संघानेही विजेत्या संघाला तोडीस तोड टक्कर दिली. या स्पर्धेत खेळाडूंनी दाखवलेल्या अष्टपैलू कौशल्याच्या जोरावर खालील खेळाडूंना वैयक्तिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यात उत्कृष्ट व्हॉलीबॉलपटू शिवराम नांदोस्कर, उत्कृष्ट स्मॅशर ओमकार रेडकर, उत्कृष्ट लिब्रो ओमकार गोसावीयांना सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे पंच म्हणून राधाकृष्ण पेडणेकर आणि श्यामसुंदर गावडे यांनी काम पाहिले. त्यांच्या अचूक आणि निष्पक्ष निर्णयामुळे सर्व सामने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. तसेच, खेळाडूंना खेळण्यासाठी उत्तम मैदान तयार ठेवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी ग्राउंड कीपर  हर्षद यशवंत डिचोलकर आणि ओम बाबू नाईक यांनी चोखपणे पार पाडली.

संपूर्ण स्पर्धेचे बहारदार आणि उत्कृष्ट सूत्रसंचालन योगेश येरम यांनी केले. त्यांच्या अष्टपैलू समालोचनामुळे प्रेक्षकांमध्ये सामन्यांविषयीची उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहिली. संस्कार नॅशनल स्कूलच्या या यशस्वी आयोजनाचे आणि विजेत्या खेळाडूंचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.