LIVE UPDATES

Commonwealth Games 2026 : रौप्य पदक जिंकत सर्वेश कुशारेची उंच उडी प्रकारात ऐतिहासिक कामगिरी

Sarvesh Kushare : सर्वेश कुशारे याने पुरुषांच्या उंच उडी प्रकारात रौप्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत या प्रकारात रौप्यपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 28, 2026 16:50 PM
views 50  views

नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games) भारताचा उंच उडीपटू सर्वेश कुशारेने अभूतपूर्व कामगिरी करीत इतिहास रचला आहे. ग्लासगो या ठिकाणी सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उंच उडीपटू सर्वेश कुशारेने पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भाग घेत २.२५ मीटर उंच उडी मारत भारतासाठी पहिल्यांदा रौप्यपदक जिंकले. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीयाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत या प्रकारात रौप्य पदक जिंकले नव्हते.  सर्वेश हा मुळचा महाराष्ट्रातील नाशिकचा आहे.

दरम्यान, सर्वेशच्या या कामगिरीमुळे भारताच्या पदकांच्या संख्येत अजू एका रौप्य पदकाची भर पडली आहे. 2022 मध्ये कॉमनवेल्थ स्पर्धेत 2.22 मीटर उंच उडी मारत तेजस्वी शंकरने कांस्य पदक जिंकले होते. सर्वेश कुशारेने २.२५ मीटरची उंची पार करून दुसरे स्थान मिळवले, तर जमैकाच्या रोमेन बेकफोर्डने सुवर्णपदक जिंकले. दोन्ही खेळाडूंनी २.२५ मीटरची समान उंची पार केली असली, तरी दोघांनाही २.२८ मीटरची उंची गाठता आली नाही. 'काउंटबॅक' नियमाच्या आधारे बेकफोर्डला विजेता घोषित करून सुवर्णपदक देण्यात आले, तर सर्वेश कुशारेला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. इंग्लंडच्या जोएल खानने २.२० मीटरची उंची पार करून कांस्यपदक जिंकले.

सर्वेश कुशारेच्या आधी, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे उंच उडीतील पहिले आणि एकमेव पदक म्हणजे २०२२ च्या बर्मिंगहॅम स्पर्धेत तेजस्विन शंकरने जिंकलेले कांस्यपदक होते. ३१ वर्षीय कुशारेने आता पदकाचा दर्जा कांस्यवरून रौप्य पदकापर्यंत उंचावला असून, भारतासाठी एक नवीन यश नोंदवले आहे.