LIVE UPDATES

बाबल पावसकर घेणार राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे धाव

तत्कालीन PI राजेंद्र मगदूम यांना ठोठावलेली शिक्षा अत्यंत तोकडी : पावसकर
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 28, 2026 11:32 AM
views 36  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

कुडाळ : १८ जानेवारी २०२५ रोजी कुडाळमध्ये घडलेल्या अत्यंत खळबळजनक मारहाणीच्या प्रकरणात मुंबई मानवी हक्क आयोगाचा अखेर निकाल लागला आहे. मात्र, या निकालाने न्याय मिळण्याऐवजी नव वळण घेतलं आहे. तत्कालीन पोलीस निरीक्षक (PI) राजेंद्र मगदूम यांना केवळ ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा 21 जुलै 2026 रोजी सुनावण्यात आल्याने तक्रारदार बाबल पावस्कर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही शिक्षा अत्यंत अपुरी असून, या निर्णयाविरोधात आता थेट दिल्ली येथील राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे दाद मागणार असल्याचा एल्गार पावसकर यांनी पुकारला आहे.

ही घटना १८ जानेवारी २०२५  रोजी घडल्याचे पावसकर यांनी सांगितल.तत्कालीन कुडाळ पोलीस निरीक्षक (PI) राजेंद्र मगदूम यांनी त्यांना पोलिस ठाण्यात मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मुंबई मानवी हक्क आयोगासमोर सुमारे दीड वर्ष चाललेल्या या कायदेशीर लढ्यानंतर ७ जुलै २०२६ आणि २१ जुलै २०२६ रोजी अंतिम निकाल देण्यात आला. या निकालामध्ये दोषी आढळलेल्या तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना इन्क्रिमेंट स्टॉप व ५०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आयोगाने ठोठावलेली ही शिक्षा अत्यंत तोकडी असून यामुळे बाबल पावसकर अजिबात समाधानी नाहीत. एका वर्दीतील जबाबदार अधिकाऱ्याने सामान्य नागरिकावर अरेरावी करत बेदम मारहाण करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा अरेरावी आणि मुजोरी करणाऱ्या अधिकाऱ्याला केवळ कागदी दंड करून पाठीशी घातले जात असल्याचा संताप व्यक्त करत, अशा प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठेवणे सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते, असा घणाघात पावस्कर यांनी केला आहे. बाबल पावसकर हे चर्मकार समाज चे जिल्हा अध्यक्ष असून त्यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत बाबल पावस्कर यांनी थेट सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या कडे मागणी केली आहे. खाकी वर्दीचा गैरवापर करणाऱ्या अशा अधिकाऱ्याची सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तात्काळ अन्यत्र बदली करण्यात यावी आणि कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी त्यांनी लावून धरली आहे.

आता बाबल पावस्कर यांनी या अन्यायाविरोधात थेट दिल्लीच्या दरबारात लढा देण्याचा पवित्रा घेतल्यामुळे, पुढे काय घडणार या कडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.