
वैभववाडी : करुळ गावठण ब येथील शेतकरी सदानंद हरिश्चंद्र कदम (वय ६०) हे मंगळवारी सकाळी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. शेताकडे जात असताना नदीतील पाण्याचा वेग आणि खोलीचा अंदाज न आल्याने ते प्रवाहात वाहून गेल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे करुळ परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहितीनुसार, सदानंद कदम हे सकाळी खत व कोयता घेऊन शेतातील कामासाठी घरातून निघाले होते. घराजवळील नदी ओलांडत असताना त्यांचा तोल गेल्याने ते थेट पुराच्या पाण्यात पडले. नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे काही क्षणांतच ते प्रवाहात बेपत्ता झाले. घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर नदीपात्र आणि परिसरात व्यापक शोधमोहीम सुरू करण्यात आली.
करुळ येथील सह्याद्री जीव रक्षक टीमचे सुमारे ४० स्वयंसेवक शोधकार्यात सहभागी झाले असून ते नदीपात्रात आणि किनारी भागात कसून शोध घेत आहेत. नदीतील पाण्याचा प्रचंड वेग आणि सतत सुरू असलेल्या पावसामुळे शोधकार्यात अडचणी येत असल्या तरी पोलीस, महसूल प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे.











