
कणकवली : महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळ, नागपूर व अमरावती आट्यापाट्या असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आट्यापाट्या पंच परीक्षेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड तसेच राज्यस्तरीय आट्यापाट्या खेळाडू दुर्वेश गोसावी व मयुरेश नारकर यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
उत्कृष्ट कामगिरीबद्दल क्रीडा क्षेत्रातून तिघांचे विशेष कौतुक होत आहे. यशाबद्दल महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाचे सचिव डॉ. अमरकांत चकोले, उपाध्यक्ष डॉ. श्रीधर धाकुलकर, डॉ. नितीन चव्हाळे, कासार्डे विकास मंडळ मुंबई सर्व पदाधिकारी तसेच कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापिका सौ.बी.बी.बिसुरे, पर्यवेक्षक एस.व्ही राणे आदींनी अभिनंदन केले आहे.
राज्यस्तरीय पंच परीक्षेत मिळालेल्या या यशामुळे भविष्यात राष्ट्रीय स्तरावरील आट्यापाट्या स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध होणार असून, कासार्डेच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे.विशेष बाब म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पंच होण्याचा मान या तिघांना मिळाला आहे.














