स्वरेया फाउंडेशनच्या कार्याचा वेग कौतुकास्पद - नगराध्यक्ष दिलीप गिरप

सिंधूरत्न भूषण चषक २०२६ कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ
Edited by: दिपेश परब
Published on: April 14, 2026 20:22 PM
views 26  views

वेंगुर्ले :  वेंगुर्ला ही क्रीडा नगरी समजली जाते. या शहराला क्रीडा क्षेत्रात फार मोठा इतिहास आहे. आमच्या अगोदरच्या पिढीने सुरू ठेवलेला क्रीडा स्पर्धांचा वारसा आम्ही पुढे नेला व आताच्या नवीन पिढीने सुद्धा हा वारसा सुरू ठेवला आहे. स्वरेया फाऊंडेशनने  वेंगुर्ला नगरीत सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. अशाच वेगात त्यांचे हे कार्य सुरू राहूदे. खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त या कबड्डी स्पर्धा वेंगुर्लेत आयोजित केल्या बद्दल आम्ही फाउंडेशनला धन्यवाद देतो. पुढील काळात स्वरेया फाउंडेशन व नगरपरिषदेच्या वतीने एकत्रित वेंगुर्लेत अनेक उपक्रम राबवू असे प्रतिपादन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी वेंगुर्ले येथे केले. 

     महाराष्ट्र राज्य व सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने वेंगुर्ला तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने, स्वरेया फाउंडेशन पुरस्कृत व जय मानशीश्वर संघ आयोजित करण्यात आलेल्या खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले येथील बॅ बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित या सिंधूरत्न भूषण चषक २०२६ कब्बडी स्पर्धेचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तसेच जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पं स सभापती शंकर घारे, खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य धनराज गोस्वामी, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, स्वरेया फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रेया महाजन, सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचे कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल, माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे, वेंगुर्ले नगरपरिषदेचे बांधकाम सभापती प्रणव वायंगणकर, महिला व बालकल्याण सभापती गौरी मराठे, नगरसेवक गौरी माईणकर, शितल आंगचेकर, समिधा रेडकर, रिया केरकर, लीना म्हापणकर,   संस्था प्रतिनिधी वीरेंद्र देसाई, सत्यवान साटेलकर, विवेक चव्हाण, शितोळे सर, जे वाय नाईक, तसेच खर्डेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक, खेळाडू  आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वरेया फाउंडेशनच्या वतीने पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. स्पर्धेच्या सुरुवातीला सुप्रसिद्ध गायिका कै. आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

   यावेळी बोलताना प्रितेश राऊळ म्हणाले, स्वतःचे आरोग्य तंदुरुस्त राखण्याच्या दृष्टीने असे कबड्डी सारखे खेळ फार महत्वाचे आहेत. स्वरेया फाउंडेशनने एक चांगली सुरुवात या तालुक्यात केली आहे याचे कौतुक करतो. पुन्हा एकदा या फाउंडेशनच्या माध्यमातून जुनी सर्व टीम कार्यान्वित झाल्याचा आनंद असल्याचेही राऊळ यांनी सांगत स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या मातीचा इमान राखणारा हा कबड्डी खेळ प्रकार आहे. खा. राणे यांच्या वाढदिवसानिमित्त या खेळाडूंना आपण संधी दिली व एक पारंपरिक खेळ पाहायला मिळतोय याबाबद स्वरेया फाउंडेशन व जय मानसीश्वर संघाला धन्यवाद देतो. सुंदर व नीटनेटके आयोजनही पाहायला मिळत आहे असे गौरवोद्गार सभापती शंकर घारे यांनी यावेळी काढले. 

   आताची पिढी ही मोबाईल मध्ये गुंतलेली दिसते. ही घराघरामध्ये मोठी समस्या निर्माण झाली आहे. इंटरनेट, मोबाईल व सोशल मीडियाचे लोकांना व्यसन लागले आहे. या व्यसनातून नवीन पिढीला बाहेर काढायचे असेल तर मैदानी खेळ खेळणे अत्यंत गरजेचे आहे. कबड्डी सारख्या मैदानी खेळामुळे माणसाच्या व्यक्तिमत्वात आमूलाग्र बदल होतो. अशा या स्पर्धा आयोजित केल्याबद्दल कौतुक करतो. असे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी सांगितले. प्राचार्य गोस्वामी यांनी सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. संस्थेचे संस्थापक व सचिव धनंजय महाजन यांच्या संकल्पनेतून स्वरेया फाउंडेशन ही संस्था शिक्षण व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. आता क्रीडा क्षेत्रात सुद्धा ही संस्था वाटचाल करत आहे. याचे सर्व श्रेय आमच्या टीमला आहे. स्थानिक खेळाडूंच्या कला गुणांना वाव मिळावा त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे हाच या स्पर्धेचा उद्देश आहे. सर्व खेळाडूंनी या स्पर्धेचा पुरेपूर आनंद घ्या. असे आवाहन स्वरेया फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रेया महाजन यांनी केले. उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश परब यांनी केले.