
वैभववाडी : महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशन व औरंगाबाद जिल्हा ॲमॅच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील ७ धावपटूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
राज्यातील ३६जिल्ह्यातील अनेक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. यामध्ये विविध गटांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याचा नावलौकिक राज्यस्तरावर उंचावला. यामध्ये खुला पुरुष गट (१० कि.मी.) या स्पर्धेत देवबा महादेव देसाई (सावंतवाडी, डेगवे) आणि महेंद्र मनोहर शेळके (वैभववाडी, शिराळे) यांनी कठीण आव्हानात्मक मार्गावर उत्कृष्ट धाव घेत स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली.१८ वर्षांखालील पुरुष गट (६ कि.मी.) मध्ये स्वागत दिनेश नाईक (कुडाळ, साळगाव) व यश किरण गोघळे (कुडाळ, परुळे)यांनी प्रभावी सहभाग नोंदवत जिल्ह्याचा मान राखला.२० वर्षांखालील पुरुष गट (८ कि.मी.) मध्ये नाऊ संतोष फाले आणि तुषार मुलाजी काळे (दोघेही दोडामार्ग, मणेरी) यांनी उत्कृष्ट संयम व वेग दाखवत स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडली. तसेच १६ वर्षांखालील मुलगे (२ कि.मी.) गटात आशीर्वाद प्रमोद सातपुते (मालवण, आचरा) याने दमदार धाव घेत लक्षवेधी कामगिरी केली.
वरील सर्व स्पर्धकांनी आपापल्या गटांत प्रत्यक्ष स्पर्धेत सहभागी होऊन उत्तम कामगिरी केली. या सर्वांची राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राज्यस्तरीय चॅम्पियनशिप गटात नाव उज्ज्वल केले. त्यांच्या या यशाबद्दल क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक व ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.














