
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेचे आयोजन रविवार, १३ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. ओरोस येथील क्रीडा संकुलाजवळून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
या स्पर्धेतून निवड झालेल्या खेळाडूंना धाराशिव (उस्मानाबाद) येथे २५ व २६ डिसेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
या स्पर्धेत पुरुष व महिला खुला गट, तसेच २०, १८, १६, १४ व १२ वर्षांखालील मुला-मुलींचे गट असणार आहेत. पुरुष व महिला खुल्या गटासाठी १० किलोमीटर, २० वर्षांखालील मुलांसाठी ८ किलोमीटर, मुलींसाठी ६ किलोमीटर, १८ वर्षांखालील मुलांसाठी ६ किलोमीटर, मुलींसाठी ४ किलोमीटर, १६ वर्षांखालील मुला-मुलींसाठी २ किलोमीटर, तर १४ व १२ वर्षांखालील मुला-मुलींसाठी प्रत्येकी १ किलोमीटर अंतराची स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेतील वयोगटांसाठी जन्मतारखेचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार २० वर्षांखालील गटासाठी २५ जानेवारी २००७ ते २४ जानेवारी २००९, १८ वर्षांखालील गटासाठी २५ जानेवारी २००९ ते २४ जानेवारी २०११, १६ वर्षांखालील गटासाठी २५ जानेवारी २०११ ते २४ जानेवारी २०१३, १४ वर्षांखालील गटासाठी २५ जानेवारी २०१३ ते २४ जानेवारी २०१५, तर १२ वर्षांखालील गटासाठी २५ जानेवारी २०१५ ते २४ जानेवारी २०१७ या कालावधीत जन्मलेल्या खेळाडूंना सहभागी होता येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंनी १२ डिसेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे. अर्जासाठीची लिंक मिळविण्यासाठी कल्पना तेंडुलकर (९३५९३९६४५०) किंवा बाळकृष्ण कदम (९१६७४६७७९६) यांच्याशी संपर्क साधावा.
स्पर्धेला येताना खेळाडूंनी आधारकार्ड, मूळ जन्मदाखला, नगरपालिका किंवा पंचायत समितीचा दाखला अथवा दहावी किंवा बारावीचे प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच UID क्रमांकाची स्लिपही आणावी. १६, १८, २० वर्षांखालील आणि खुल्या गटातील खेळाडूंसाठी UID क्रमांक अनिवार्य आहे. स्पर्धा संपल्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेसाठीचे अर्ज तातडीने भरून घेतले जाणार आहेत.
ही स्पर्धा केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंसाठी मर्यादित आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांतील खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी होऊ नये. अन्य जिल्ह्यांतील खेळाडूंनी सहभाग घेऊन क्रमांक मिळविल्यास त्यांचे विजेतेपद रद्द करण्यात येईल, असे असोसिएशनने स्पष्ट केले आहे. १२ व १४ वर्षांखालील गटातील स्पर्धा केवळ जिल्हास्तरीय असून या गटांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आलेली नाही.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना पदके व गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष रणजितसिंग राणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी असोसिएशनच्या सचिव कल्पना तेंडुलकर यांच्याशी संपर्क साधावा.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








