
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित जिल्हा निवड चाचणी २०२६ क्रीडा स्पर्धेचा भव्य आणि उत्साही वातावरणात २१ जून २०२६ रोजी कुडाळ येथील संत राऊळ महाराज बॅडमिंटन अकादमी येथे शानदार समारोप झाला. या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील १२० हून अधिक खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपले उत्कृष्ट क्रीडा कौशल्य पणाला लावले.
या स्पर्धेमध्ये ९, ११, १३, १५, १७, १९ वर्षांखालील मुले-मुली तसेच खुला गट अशा विविध वयोगटांचा समावेश होता. या सर्व गटांमध्ये एकेरी, दुहेरी आणि मिक्स दुहेरी अशा स्वरूपात सामने खेळवण्यात आले. राष्ट्रीय बॅडमिंटन मार्गदर्शक तत्त्वांनुसार १५-१५-१५ च्या ३ गुणांच्या रचनेनुसार हे सामने अत्यंत चुरशीने पार पडले.
२० जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता या स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अधिवक्ता सुहास सावंत, संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे समद शेख, सचिव सोमदत्त चव्हाण आणि खजिनदार योगेश कोळी उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
स्पर्धेच्या सांगता समारोहात उपस्थित प्रतिष्ठित पालकांच्या हस्ते विजयी आणि उपविजेत्या खेळाडूंना आकर्षक चषक, पदके आणि रोख रक्कम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. उपस्थित पालकांनी सर्व विजयी खेळाडूंचे मनापासून अभिनंदन केले. यावेळी दिनेश म्हाडगुत यांनी उपस्थित राहून स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंच्या कौशल्याचे आणि आयोजन समितीच्या उत्तम नियोजनाचे विशेष कौतुक केले.
स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर, सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव सोमदत्त चव्हाण यांनी या दोन दिवसीय कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सर्व पाहुणे, क्रीडाप्रेमी, पालक आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे संस्थेच्या वतीने आभार मानले.














