
सावंतवाडी : शहरातील ऐतिहासिक व प्रमुख क्रीडाकेंद्र असलेल्या जिमखाना मैदानाची विविध स्पर्धांसाठी दर्जेदार उभारणी करण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि क्रीडा व आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून आज महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मुख्य सदस्य राहुल शेवाळे यांनी सावंतवाडीतील जिमखाना मैदानाला प्रत्यक्ष भेट देऊन विस्तृत पाहणी केली.
भविष्यात या मैदानाचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसोबत टाय-अप करून येथे रणजी करंडक सामने, तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट सामन्यांचे आयोजन करता यावे, असा दर्जा या मैदानास मिळवून देण्याच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
राहुल शेवाळे हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचे मुख्य सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांनी सावंतवाडी जिमखाना मैदानाला दिलेली भेट ही या क्रीडांगणाच्या नूतनीकरण व विकासासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे. या पाहणीदरम्यान उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी राहुल शेवाळे यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन औचित्यपूर्ण स्वागत केले. या पाहणी दौऱ्याप्रसंगी सावंतवाडी नगरपरिषदेचे क्रीडा व आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, ज्येष्ठ क्रिकेटर दिनेश कुबडे यांच्यासह शहरातील अनेक दिग्गज खेळाडू व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावंतवाडी व संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना उत्तम दर्जाच्या क्रीडा सुविधा मिळाव्यात आणि स्थानिक गुणवंत खेळाडूंना रणजी व राज्यस्तरीय क्रिकेट खेळण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, ही सावंतवाडीकरांची अनेक वर्षांची मागणी आहे.
राहुल शेवाळे यांच्या या महत्वपूर्ण भेटीमुळे आणि नगरपरिषदेच्या या सकारात्मक पुढाकारामुळे भविष्यात जिमखाना मैदानावर भव्य सामने रंगणार, अशी आशा निर्माण झाली असून स्थानिक खेळाडू व क्रिकेटप्रेमींमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








