
सावंतवाडी : सांगली येथील नुतन बुदधिबळ मंडळाने "कै.बाबुकाका शिरगावकर आंतरराष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुदधिबळ स्पर्धेचे" आयोजन केले होते. या स्पर्धेत दोनशे सव्वीस खेळाडूंनी सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीचे बाळकृष्ण पेडणेकर, विभव राऊळ, मयुरेश परुळेकर, यथार्थ डांगी, पुष्कर केळूसकर, चिदानंद रेडकर, हर्ष राऊळ, पार्थ गावकर, विराज दळवी, यश सावंत, गार्गी सावंत, मानस सावंत या बारा विदयार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
जिल्ह्यातील आघाडीचा राष्ट्रीय खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर आणि चौदा वर्षीय राष्ट्रीय खेळाडू विभव राऊळ या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करून स्पर्धेत अनुक्रमे अठरावा आणि चोवीसावा क्रमांक पटकावला. बाळकृष्ण आणि विभवने नऊ राऊंडमध्ये प्रत्येकी सहा गुण केले. ॲकेडमीचा पन्नास टक्के दृष्टिदोष असलेला मालवण येथील एकोणीस वर्षीय राष्ट्रीय खेळाडू मयुुरेेश परुळेकर याने पाच गुण करुन गटात द्वितीय क्रमांक पटकावला. चौदा वर्षीय राष्ट्रीय खेळाडू यथार्थ डांगी याने पाच गुण करुन तेरा वर्षाखालील गटात चौथा क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे ॲकेडमीचा तेरा वर्षीय विदयार्थी पुष्कर केळूसकर याने दुस-याच रॅपिड रेटिंग स्पर्धेत सहभाग घेऊन आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळवले. त्याने दोन रेटेड खेळाडूंना हरवून आणि एक रेटेड खेळाडूसोबत बरोबरी करुन साडेचार गुणांची कमाई केली. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष व प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर आणि राष्ट्रीय प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे यांच्या मार्गदर्शनखाली या विदयार्थ्यांनी हे यश मिळवले आहे.युवराज लखमराजे भोंसले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच ॲकेडमीचे सर्व विदयार्थी आणि कौस्तुभ पेडणेकर सरांचे कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.