
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात रस्ता सुरक्षा जनजागृती अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित “रस्ता सुरक्षा क्रीडा स्पर्धा – २०२६” हा अभिनव उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आणि खेळभावनेत यशस्वीरित्या पार पडला. क्रीडा आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर संगम साधत या स्पर्धेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री व मान्यवरांनी कॅरम खेळत स्पर्धेची रंगत वाढवली आणि “रस्ता सुरक्षा हीच खरी जीवन सुरक्षा” हा मोलाचा संदेश दिला.
विविध क्रीडा प्रकारांचा जल्लोष
या स्पर्धेत बॉक्स क्रिकेट, रस्सीखेच, कॅरम, बुद्धिबळ, बॅडमिंटन तसेच विविध मैत्रीपूर्ण सामने आयोजित करण्यात आले. बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे अनावरण जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाले. शासकीय अधिकारी-कर्मचारी आणि पत्रकार बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला रंगत आणली.
विशेष आकर्षण ठरलेला प्रदर्शनीय सामना ‘जिल्हा कलेक्टर संघ’ विरुद्ध ‘पत्रकार बांधव संघ’ यांच्यात रंगला. दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळ सादर करत खेळभावनेचा आदर्श निर्माण केला.
यावेळी मोटार वाहन निरीक्षकांनी चारचाकी व दुचाकी वाहन नियमांनुसार चालवण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. हेल्मेटचा वापर, सीटबेल्ट सक्ती, वेगमर्यादा आणि वाहतूक शिस्त याबाबत प्रभावी मार्गदर्शन करण्यात आले.
“रस्ता सुरक्षा सापशिडी”चा नाविन्यपूर्ण प्रयोग
या उपक्रमातील “रस्ता सुरक्षा सापशिडी” हा खेळ विशेष लोकप्रिय ठरला. साप आल्यास रस्ता सुरक्षेविषयी प्रश्न विचारण्यात येत होता आणि योग्य उत्तर दिल्यास खेळाडूस जीवनदान दिले जात होते. खेळाच्या माध्यमातून वाहतूक नियमांची माहिती देण्याचा हा अभिनव प्रयोग सर्वांच्या पसंतीस उतरला.
स्पर्धेतील विजेते
बुद्धिबळ स्पर्धा विजेता – नितीन तुरणर
कॅरम स्पर्धा विजेता – अजित तारी
बॅडमिंटन (पुरुष गट) विजेता – स्वप्निल सावंत
बॅडमिंटन (महिला गट) विजेता – आरती देसाई
क्रिकेट स्पर्धा विजेता संघ – मेडिकल कॉलेज संघ
रस्सीखेच स्पर्धा विजेता संघ – RTO संघ
समारोप समारंभात सर्व सहभागी संघ, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात आले. नियोजनबद्ध व शिस्तबद्ध आयोजनामुळे हा उपक्रम जिल्ह्यात आदर्श ठरला आहे.
“खेळातून रस्ता सुरक्षा” हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा उद्देश साध्य झाला असून, भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे जनजागृती सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.














