LIVE UPDATES

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय, टी-२० मालिकेचे वेळापत्रक जाहीर

११ जानेवारी २०२६ रोजी पहिला एकदिवसीय सामना
Edited by: ब्‍युरो
Published on: June 16, 2025 13:38 PM
views 20  views

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पांढऱ्या चेंडूवरील मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. न्यूझीलंडचा संघ जानेवारी २०२६ मध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये ३ एकदिवसीय आणि ५ टी २० सामने खेळले जातील. न्यूझीलंडचा भारत दौरा ११ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान असेल.

पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये टी२० विश्वचषक खेळला जाणार आहे. त्यापूर्वी, विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने न्यूझीलंडविरुद्धची टी२० मालिका भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची मालिका असेल. २०२६ मध्ये भारतीय संघाची ही पहिली मालिका असेल. याआधी २०२५ च्या अखेरीपर्यंत टीम इंडिया खूप व्यस्त राहणार आहे. जून-डिसेंबर २०२५ दरम्यान, भारतीय संघ इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळणार आहे.

एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना ११ जानेवारी रोजी हैदराबादमध्ये, दुसरा सामना १४ जानेवारी रोजी राजकोटमध्ये आणि शेवटचा सामना १८ जानेवारी रोजी इंदूरमध्ये खेळला जाईल. यानंतर, पहिला टी-२० सामना २१ जानेवारी रोजी नागपूरमध्ये, दुसरा सामना २३ जानेवारी रोजी रांचीमध्ये, तिसरा सामना २५ जानेवारी रोजी गुवाहाटीमध्ये, चौथा सामना २८ जानेवारी रोजी विशाखापट्टणममध्ये आणि शेवटचा टी-२० सामना ३१ जानेवारी रोजी त्रिवेंद्रममध्ये खेळला जाईल.

यंदाच्या मोसमातील ही रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा दोन टप्प्यांत होणार आहे. १५ ऑक्टोबर ते २८ फेब्रुवारी असा एकूण कालावधी असणार आहे. यंदा प्रथमच एलिट गटातील एकच संघ प्लेट गटात जाईल. गेल्या मोसमापर्यंत तळाचे दोन संघ प्लेट गटात जात होते. तर प्लेट गटातील पहिले दोन संघ एलिट गटात स्थान मिळवत होते. हाच नियम पुरुषांच्या सीनियर आणि ज्युनियर गटातील सर्व स्पर्धांना लागू असणार आहे.

रणजीच्या साखळी स्पर्धेचा पहिला टप्पा १५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर आणि दुसरा टप्पा २२ जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत होईल, त्यानंतर ६ ते २८ फेब्रुवारीदरम्यान बाद फेरीचे सामने होतील. यंदापासून दुलीप करंडक पुन्हा विभागीय स्तरावर होणार आहे. ही स्पर्धा २८ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरदरम्यान होईल. यासाठी विभागीय निवड समिती त्यांच्या विभागाचा संघ निवडेल. इराणी करंडक सामना १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान होईल. हा सामना विद्यमान रणजी विजेते विदर्भ विरुद्ध शेष भारत यांच्यात होईल.