भारतीय संघ पुन्हा एकदा चॅम्पियन

टी-20 वर्ल्ड कप जिंकला
Edited by:
Published on: March 08, 2026 23:18 PM
views 45  views

अहमदाबाद: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात फायनल सामना रंगला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 255 धावांचा डोंगर उभारला. न्यूझीलंडला फायनल सामन्यात 159 धावा करु शकले. भारतीय संघाने फायनल सामना 96 धावांनी जिंकला. भारतीय संघ 2026 चा टी-20 विश्वचषकाचा फायनल सामना जिंकला आणि चॅम्पियन बनला. फायनल सामना जिंकताच भारतीय संघाने इतिहास रचला.

तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकणारा भारत पहिलाच देश ठरला. तर घरच्या मैदानावर टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा पहिलाच देश ठरला. सलग दोन वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा पहिलाच देश ठरला. म्हणजे टी-20 विश्वचषक जिंकलाच नाही तर त्यासोबतच भारतीय संघाने इतिहास रचला.

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि इशान किशन यांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर भारताने 255 धावांचा मोठा आकडा उभारला आणि न्यूझीलंडसमोर विजयासाठी 256 धावांचे लक्ष्य ठेवले. अभिषेक आणि संजू यांनी केवळ 7.1 षटकांत 98 धावांची सलामी भागीदारी करत टीम इंडियाला चांगली सुरुवात दिली. टीम इंडियाने आयसीसी टी20 विश्वचषक फायनलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली.

अभिषेकने 21 चेंडूत 52 धावा, संजू सॅमसनने 47 चेंडूत 89 धावा आणि इशान किशनने 25 चेंडूत 54 धावा केल्या. शेवटी दुबेने 8 चेंडूत 26 धावा केल्या. न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल सँटनरने नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय संघाने सामन्यात कोणताही बदल केला नाही, तर न्यूझीलंडने एक बदल केला.

256 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड कधीही विजयाच्या शर्यतीत नव्हता. टिम सेफर्टच्या 52 आणि कर्णधार मिचेल सँटनरच्या 43 धावा वगळता, इतर कोणत्याही किवी फलंदाजाला प्रभावी खेळी करता आली नाही. या सामन्यात डॅरिल मिशेलने 11 चेंडूत 17 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक चार बळी घेतले. अक्षर पटेलने तीन फलंदाजांना बाद केले. हार्दिक पंड्या, वरुण चक्रवर्ती आणि अभिषेक शर्मा यांनीही प्रत्येकी एक बळी घेतला.