भारतीय महिला क्रिकेट संघात मालवणच्या कन्येची निवड !

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 21, 2023 20:05 PM
views 3493  views

मालवण : भारतीय महिला क्रिकेट संघात मालवण तालुक्यातील आंबडोस गावची कन्या प्रकाशिका प्रकाश नाईक हीची निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया टी २० च्या महिला क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघाला चॅम्पियनशिप मिळवून देण्यात प्रकाशिका हिने महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे क्रिकेट बोर्डाने आज केलेल्या निवड यादीत तिची अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड केली  आहे. 

शाळा स्तरापासून क्रिकेट खेळाची अत्यंत आवड असलेल्या प्रकाशिका हिने उत्तरोत्तर आपली प्रगती साधली आहे. सुरुवातीला भारताच्या १९ वर्षाखालील महिलांच्या संघात स्थान प्राप्त केल्यानंतर ती मुंबई महिला संघाची उप कर्णधार बनली होती. त्यानंतर ती मुंबई संघाची कर्णधार म्हणून कार्यरत होती. नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया टी २० स्पर्धेत मुंबई संघाला चॅम्पियनशिप मिळाली आहे. यामध्ये प्रकाशिका हिने महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे तिची भारतीय महिला संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली आहे. 

इंग्लंड देशाचा अ संघ भारत देशाच्या दौऱ्यावर येत आहे. २९ नोव्हेंबर पासून वानखेडे स्टेडियमवर हे सामने होत आहेत. २९ नोव्हेंबर आणि १, ३ डिसेंबर असे एकूण तीन सामने होणार आहेत. यामध्ये प्रकाशिका खेळणार आहे. 

     प्रकाशिका ही अष्टपैलू खेळाडू आहे. ती राईट आर्म लेग स्पिनर आहे. तसेच स्लीप क्षेत्रातील स्पेशालिस्ट खेळाडू म्हणून तिची ओळख आहे. राईट आर्म उत्तम फलंदाज आहे. तिच्या निवडीने आंबडोस परिसरात आनंद व्यक्त होत आहे. प्रकाशिका हिच्या निवडीने आपल्या गावाचे नाव जगाच्या पाठीवर पोहोचणार असल्याच्या भावना आंबडोस गावावासियांकडून व्यक्त होत आहेत.