
नवी दिल्ली : भारताला २०२५ च्या महिला विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून देऊन इतिहास घडवणाऱ्या हरमनप्रीत कौरने अचानक सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिने इन्स्टाग्रामवर एका भावूक पोस्टद्वारे ही घोषणा केली. तिच्या नेतृत्वाखाली भारताने नुकतेच २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर, स्मृती मानधनाकडे कर्णधारपद सोपवले जाण्याची दाट शक्यता आहे. मानधना ही महिला क्रिकेट संघातील एक स्टार खेळाडू असून तिची तिन्ही प्रकारांमधील कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. तसेच हरमनप्रीत कौरच्या कार्यकाळात तिने अनेक वर्षे संघाची उपकर्णधार म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
हरमनप्रीत कौरने कर्णधारपद सोडले असले तरी, तिने खेळांतून निवृत्ती घेतलेली नाही आणि ती एक खेळाडू म्हणून भारतीय संघासाठी खेळणे सुरूच ठेवणार आहे.
हरमनप्रीत कौरने इंस्टाग्रामवर लिहिले, "आज मी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होत आहे. हा निर्णय घेणे सोपे नव्हते. यात अनेक वर्षांच्या आठवणी, भावना, त्याग आणि असे क्षण सामावलेले आहेत जे आयुष्यभर माझ्यासोबत राहतील. मी या संघासाठी आणि भारतीय महिला क्रिकेटसाठी माझे सर्वस्व अर्पण केले आहे. माझे रक्त, माझा घाम, माझा वेळ आणि अनेकदा माझ्या स्वतःच्या खेळाचा व वैयक्तिक महत्त्वाकांक्षांचाही काही भाग. असेही काही प्रसंग आले जेव्हा मला माझी वैयक्तिक कामगिरी, माझी प्रगती आणि माझ्या स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवाव्या लागल्या. कारण माझ्यासाठी संघ नेहमीच प्रथम होता. कर्णधार म्हणून मला अनेक कठीण निर्णय घ्यावे लागले.
असे निर्णय जे नेहमीच समजले गेले नाहीत, जे नेहमीच सोपे नव्हते आणि ज्यांची किंमत मला वैयक्तिक पातळीवरही मोजावी लागली. पण मी घेतलेल्या प्रत्येक निर्णयामागे एकच उद्देश होता तो म्हणजे संघाला अधिक सक्षम करणे आणि इतर खेळाडूंना प्रगती करण्याची, स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि स्वतःचे सर्वोत्तम रूप घडवण्याची संधी देणे. मी हे सर्व अनुभवले आहे.
मी अत्यंत कठीण क्षण पाहिले आहेत. हृदयद्रावक प्रसंग, टीका, शंका आणि असे दिवस जेव्हा काहीच आमच्या मनासारखे घडले नाही आणि मी यशाचे सर्वोच्च क्षणही पाहिले आहेत. विजय, जल्लोष, देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा अभिमान आणि असे क्षण जेव्हा केलेल्या प्रत्येक त्यागाचे सार्थक झाले. आज, मी भावूक होऊनही शांत मनाने कर्णधारपदाचा निरोप घेत आहे. कारण माझा ठाम विश्वास आहे की माझा संघ आता एका चांगल्या स्थितीत आहे. असा संघ ज्याच्याकडे गुणवत्ता, चारित्र्य आणि आत्मविश्वास आहे आणि ज्याच्या भविष्याकडे पाहण्यास आणि त्याचा एक भाग असण्यास मी उत्सुक आहे.
मला वाटते की मी माझे कर्तव्य पूर्ण केले आहे. मी या संघासाठी माझे सर्वस्व दिले. मी अभिमानाने ही जबाबदारी पेलली आणि भारतीय महिला क्रिकेटचे नेतृत्व करण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल मी सदैव कृतज्ञ राहीन. आता आयुष्यातील एक नवीन पान उलटण्याची वेळ आली आहे. कर्णधारपद आज संपत असेल, पण भारतीय क्रिकेटसाठी..." या खेळावरील माझे प्रेम कधीच कमी होणार नाही.
माझ्या प्रत्येक सहकारी खेळाडूचे, प्रशिक्षकाचे, सपोर्ट स्टाफ सदस्याचे, व्यवस्थापनातील अधिकाऱ्याचे, बीसीसीआयचे (BCCI), कुटुंबातील सदस्यांचे आणि सुख-दुःखाच्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या प्रत्येक चाहत्यांचे आभार. रक्त. घाम. सन्मान. अभिमान. मी माझे सर्वस्व पणाला लावले. आता, केवळ खेळावरील प्रेमापोटी पुन्हा खेळायला मी सज्ज आहे. कर्णधारपदाचा अध्याय संपला असला, तरी माझा प्रवास सुरूच राहणार आहे.
हरमनप्रीत कौर यांची कामगिरी
हरमनप्रीत कौर आता ३७ वर्षांच्या आहेत. त्यांनी गेल्या दशकात भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले. २०१६ मध्ये त्यांची सर्वप्रथम टी-२० संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेकदा आशिया चषक जिंकला आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग सुवर्णपदके पटकावली. त्यांच्या या कामगिरीची दीर्घकाळ आठवण ठेवली जाईल.














