
वैभववाडी : भाजपा किसान मोर्चाच्या वैभववाडी मंडल अध्यक्षपदी आचिर्णे येथील सुशीलकुमार रावराणे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा किसान मोर्चाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्या हस्ते श्री.रावराणे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
सुशीलकुमार रावराणे हे कृषी क्षेत्राशी सातत्याने जोडलेले असून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव आहे. ते वैभवक्रांती शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक असून तालुका आत्मा समितीचे सदस्य आहेत. तसेच त्यांनी आचिर्णे गावचे उपसरपंच म्हणूनही यशस्वीपणे काम पाहिले आहे. प्रमुख ऊस उत्पादक शेतकरी म्हणूनही त्यांची ओळख आहे.
कृषी क्षेत्रातील प्रगल्भता, शेतकऱ्यांशी असलेला थेट संपर्क आणि विविध पदांवर काम करण्याचा अनुभव असल्यामुळे त्यांची ही निवड करण्यात आली आहे. या पदाच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्या निवडीचे तालुक्यातील शेतकरी तसेच भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.
या निवडीनंतर बोलताना सुशीलकुमार रावराणे म्हणाले, “पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम केले जाईल. येत्या आठवडाभरात तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा समावेश असलेली तालुका समिती जाहीर करण्यात येईल. या समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असा विश्वास व्यक्त केला.










