LIVE UPDATES

भोसले सैनिक स्कूलमध्ये सायमल्टेनिअस चेस प्ले

१०५ विद्यार्थ्यांनी शरद वझे यांच्यासोबत खेळला बुद्धीबळाचा डाव
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 03, 2026 18:15 PM
views 38  views

सावंतवाडी : बुद्धिबळाच्या प्रसारासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये या खेळाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने यशवंतराव भोसले सैनिक स्कूल येथे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू शरद वझे यांच्या सहभागातून आयोजित करण्यात आलेला ‘सायमल्टेनिअस चेस प्ले’ हा अनोखा उपक्रम उत्साहात संपन्न झाला.

एकाचवेळी अनेक खेळाडूंसोबत एकटे बुद्धिबळ खेळण्याच्या या वैशिष्ट्यपूर्ण प्रकारासाठी शरद वझे विशेष ओळखले जातात. त्यांनी दिवसभरात सैनिक स्कूलच्या १०५ विद्यार्थ्यांसोबत विविध बॅचेसमध्ये सलग बुद्धिबळाचे सामने खेळले.

प्रत्येक पटावरील डावावर लक्ष ठेवत, प्रतिस्पर्ध्याच्या चालीचा अंदाज घेत पुढील पटाकडे जाणे आणि एकाचवेळी अनेक डावांचे आकलन करणे हे त्यांच्या खेळाचे वैशिष्ट्य ठरले. त्यांच्या वेगवान खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

विश्वनाथ आनंद यांनी २००७ मध्ये बुद्धिबळाचे विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर बुद्धिबळाच्या प्रसारासाठी शरद वझे यांनी १ मे २००८ पासून ‘बुद्धिबळ प्रज्ञा शोध’ हा उपक्रम सुरू केला. या माध्यमातून त्यांनी आजवर नऊ राज्यांतील दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांसोबत सायमल्टेनिअस बुद्धिबळ सामने खेळले आहेत.

सलग १३ तास बुद्धिबळ खेळण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर नोंद आहे. बुद्धिबळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, संयम, विचारक्षमता आणि निर्णयक्षमता विकसित व्हावी हा त्यांच्या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

यावेळी त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या खेळाचे बारकाईने निरीक्षण करून मूल्यमापन केले. त्यामध्ये तीन विद्यार्थ्यांना ‘सी’ ही उत्कृष्ट श्रेणी, तर उर्वरित विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीनुसार ‘ए’ आणि ‘बी’ श्रेणी देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या चाली, डावपेच, विचार करण्याची पद्धत व निर्णयक्षमता यांचा विचार करून हे मूल्यमापन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी भोसले नॉलेज सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ले. कर्नल डॉ.रत्नेश सिन्हा, भोसले सैनिक स्कूलचे प्राचार्य सॅव्हिओ फर्नांडिस, भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रियांका देसाई, उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक, शिक्षक व पालक उपस्थित होते. निवेदन क्रेसिडा डिसोझा तर आभार प्रदर्शन श्वेता खानोलकर यांनी केले.