
काठमांडू : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी आलेल्या भोटे कोशी-त्रिशुली पुरांनंतरची अत्यावश्यक नसलेली शोध आणि बचाव मोहीम थांबवण्यात आली आहेत. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, या पुरामुळे १,४५५ जणांचा मृत्यू झाला असून ५,२८५ लोक बेपत्ता आहेत. या बेपत्ता लोकांमध्ये १८९ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रामधून १० पेक्षा जास्त नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.
पुराच्या घटनेनंतर सुरू असलेली अत्यावश्यक नसलेली शोध आणि बचाव मोहीम स्थगित करण्याचा निर्णय नेपाळने सोमवारी घेतला. आता देशाचे लक्ष मदत आणि शोध कार्यावरून पुनर्बांधणी आणि पुनर्वसनाकडे वळवले जाईल.
दरम्यान, नेपाळच्या 'राष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण आणि व्यवस्थापन परिषदे'ने पुनर्रचना आणि पुनर्वसनाशी संबंधित ५०४ कार्यक्रमांसाठी ५५९ अब्ज नेपाळी रुपये (सुमारे ३५,००० कोटी रुपये) मंजूर करण्याची शिफारस अर्थ मंत्रालयाकडे केली आहे.
पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 'नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन ॲन्ड मॅनेजमेंट काऊन्सिल' (National Disaster Risk Reduction and Management Council) च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समित्या, 'नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन ॲन्ड मॅनेजमेंट काऊन्सिल' (NDRRMA) आणि पूरग्रस्त भागांची पाहणी करणाऱ्या पथकांच्या शिफारशींनंतर हे पाऊल उचलण्यात आले.
५,२८५ लोक अजूनही बेपत्ता
२६ ऑगस्ट रोजी नेपाळमध्ये आलेल्या भोटे कोशी-त्रिशुली पुरामुळे प्रचंड विध्वंस झाला. या आपत्तीत १,४५५ जणांचा मृत्यू झाला असून ५,२८५ लोक अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्ता असलेल्यांमध्ये १८९ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, इतर देशांचे पासपोर्ट बाळगणारे भारतीय वंशाचे अनेक नागरिकही बेपत्ता आहेत.
नेपाळच्या पर्यटन विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, पुरामुळे ३६ देशांतील ६०६ परदेशी पर्यटक बेपत्ता आहेत. तर भारतातील विविध राज्यांतून गोळा केलेल्या माहितीनुसार, बेपत्ता भारतीयांमध्ये सर्वाधिक संख्या तामिळनाडूतील नागरिकांची आहे.
तमिळनाडूतील ८५, पश्चिम बंगालमधील ३७, गुजरातमधील ३०, तेलंगणातील २५, उत्तर प्रदेश येथील २२, कर्नाटकातील १३, आंध्र प्रदेशमधील १३, बिहारमधील १२, महाराष्ट्रातील १० पेक्षा जास्त तर ओडिशातील ४ नागरिकांचा बेपत्तांमध्ये समावेश आहे.














