वैभववाडीत 5 एप्रिलपासून भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

खा. नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजन
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 26, 2026 20:24 PM
views 10  views

नाधवडे येथे रंगणार पाच दिवसीय स्पर्धेचा थरार 

वैभववाडी : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘सिंधुनायक चषक २०२६’ या राष्ट्रीय स्तरावरील भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ५ ते ९ एप्रिल २०२६ दरम्यान नाधवडे (ता. वैभववाडी) येथील श्री महादेव मंदिर मैदानावर रंगणार आहे.

  पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेत विविध राज्यांतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सहभागी होणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचा भव्य क्रीडा सोहळा अनुभवायला मिळणार आहे. देशभरातील तब्बल ६४ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

 सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ जवळून पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला मोठी चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

 स्पर्धेचे उद्घाटन ५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता होणार असून संपूर्ण स्पर्धा प्रकाशझोतात खेळवली जाणार आहे. प्रेक्षकांसाठी उत्कृष्ट आसनव्यवस्था, लाईव्ह स्कोअर, समालोचन आणि आधुनिक साऊंड सिस्टीमची सोय करण्यात येणार आहे.

  स्पर्धेतील विजेत्या संघाला तब्बल ५ लाख ७५ हजार ५७५ रुपये तर उपविजेत्या संघाला २ लाख ७५ हजार ५७५ रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि सामनावीर यांनाही आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. महिला व पुरुषांसाठी विशेष लकी ड्रॉचे आयोजनही करण्यात आले आहे.

 या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, वैभववाडी सभापती सिद्धेश रावराणे, माजी उपसभापती बंड्या मांजरेकर, भाजपा मंडळ अध्यक्ष दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, सुधीर नकाशे आदींसह अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

या भव्य स्पर्धेस सर्व क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.