जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेची दिक्षा चव्हाण विजेती ; सागर ढवळ उपविजेता

कुडाळ भाजपच्यावतीने खा. नारायण राणेंच्या वाढदिवसाचं निमित्त
Edited by: विनायक गांवस
Published on: April 11, 2026 16:25 PM
views 16  views

सावंतवाडी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कोकण संसद समृद्धी महोत्सव 2026 जिल्हाभर साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टी कुडाळ यांनी यानिमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत कणकवली येथील दिक्षा नंदकिशोर चव्हाण हिने विजेतेपद पटकावले.

स्पर्धेचे उद्घाटन कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे, भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष अॅडवोकेट अवधूत भणगे, उपाध्यक्ष. सुनील धुरी व अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कॅरम बोर्डवर ब्रेक करून करण्यात आले. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या नवीन सुपर सिक्स चॅलेंजर फॉरमॅटमध्ये  जिल्हास्तरीय खुल्या गटामधे ही स्पर्धा खेळविण्यात आली. जिल्हाभरातून 64 स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. दुसऱ्या फेरीपासूनच स्पर्धा रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली. या स्पर्धेतील मागील वर्षीचा उपविजेता कुडाळचा प्रशांत म्हात्रे याच्यावर कुडाळ कॅरम क्लबच्या सिद्धेश शिवडावकरने तिसऱ्या सेटमध्ये विजय मिळवत स्पर्धेमध्ये रंगत निर्माण केली. मालवण येथील ज्येष्ठ खेळाडू राजू पावसकर यांनी उपउपांत्य फेरीपर्यंत धडक मारली. 

 उपउपांत्य फेरीचे सामने अनिल तायशेटे विरुद्ध गौतम यादव, उमेश लोहार विरुद्ध सागर ढवळ, केशर निर्गुण विरुद्ध राजू पावसकर व सचिन घाडी विरुद्ध दिक्षा चव्हाण असे झाले. उपांत्य फेरीमध्ये अनिल तायशेटे यांचा सामना सागर ढवळशी विरुद्ध तर  सिंधुदुर्गच्या दोघी राष्ट्रीय खेळाडू केशर निर्गुण व दिक्षा चव्हाण एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या. यामध्ये सागर ढवळने अनिल तायशेटे यांच्यावर सरळ सेट मध्ये मात केली. केशर आणि दिक्षा यांच्यामध्ये मात्र चुरशीची सामना झाला. . पहिला सेट केशरने सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये दिक्षाने केशरला कडवी झुंज दिली आणि बरोबरी साधली. तिसऱ्या सेटमध्ये सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाच्या जोरावर आघाडी घेत दिक्षाची सरशी झाली. अंतिम सामन्यांमध्ये पहिला सेट सागरला प्रतिकाराची फारशी संधी न देत दिक्षाने सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सागरने आपला अनुभव पणाला लावला. आणि शेवटच्या दोन बोर्डमधे उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. निर्णायक सेटमधे दिक्षाने युवा क्रिकेटपटू वैभव सुर्यवंशीच्या खेळाप्रमाणे धाडसी खेळाचे प्रदर्शन केले व सामना जिंकत आपल्या पहिल्या वहिल्या वरिष्ठ खुल्या अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केला.

पहिल्या ८ क्रमांकाच्या खेळाडूंना रोख रकमेची बक्षिसे, चषक आणि मेडल्स देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व विजेत्यांचे कुडाळ तालुका भाजपाचे अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर व सर्व पदाधिकारी तसेच सिंधुदुर्ग कॅरम परिवाराकडून अभिनंदन करण्यात आले.