LIVE UPDATES

सिंधुदुर्गनगरीत पत्रकारांसाठी ११ मार्चला टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: March 06, 2026 17:57 PM
views 135  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने जिल्ह्यातील पत्रकारांसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा बुधवार ११ मार्च रोजी सिंधुदुर्गनगरी येथील क्रीडा संकुल मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या  जिल्हास्तरीय पत्रकार टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे पाचवे वर्ष असून जिल्ह्यातील सर्व तालुका पत्रकार संघाने आपल्या टीम सह या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यालय पत्रकार संघ अध्यक्ष लवू म्हाडेश्वर व सचिव दत्तप्रसाद वालावलकर यांनी संयुक्तरित्या केले आहे.

विजेत्या संघास ७७७७ रुपये, उपविजेत्या संघाला इलेक्ट्रॉनिक मिडिया पुरस्कृत ५५५५ रुपये असे रोख बक्षीस व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तसेच पूर्ण मालिकेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला ज्येष्ठ पत्रकार कै प्रवीण मांजरेकर यांच्या नावाने आकर्षक चषक देण्यात येणार आहे. मालिकावीर, शेवटचा सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यांनाही आकर्षक चषक देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील पत्रकारांना क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र येवून एक दिवस आनंद लुटता यावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वप्रथम जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाने 'पत्रकारांची क्रिकेट स्पर्धा' भरवण्याची संकल्पना सुरू करत ती यशस्वी केली. त्याच संकल्पनेनुसार मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने सिंधुदुर्गनगरी येथील  क्रीडा संकुल मैदानावर पाचव्या वेळी ११ मार्च रोजी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील आठ तालुका आणि एक मुख्यालय पत्रकार संघ आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया असे एकूण दहा क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत. 

या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ मोहन दहिकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. तर बक्षीस वितरण जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. स्पर्धा सकाळी लवकर सुरू करण्यात येणार असून दुपारच्या सत्रात विश्रांती घेऊन सायंकाळच्या सत्रात उर्वरित सामने होणार आहेत.