
देवगड : तालुक्यातील वळीवंडे गावची कन्या धन्वी नितीन वळंजू हिने दक्षिण कोरियामध्ये आयोजित १९ व्या जागतिक तायक्वान्डो कल्चर एक्स्पो २०२६ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय यश संपादन केले. धन्वीने क्योरुगी आणि पुमसे या दोन्ही प्रकारांत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत दोन रौप्यपदके (सिल्वर मेडल) पटकावून देवगड तालुक्याचे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.
धन्वी सध्या मुंबई सेंट्रल येथील सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिक्षण घेत असून, लहान वयातच तिने तायक्वान्डो क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यापूर्वी गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने एक सुवर्ण व एक कांस्यपदक जिंकले होते. तसेच जून २०२६ मध्ये पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय तायक्वान्डो स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई करून आपले कौशल्य सिद्ध केले होते.
या सातत्यपूर्ण यशामुळेच तिची दक्षिण कोरियातील प्रतिष्ठेच्या जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही तिने उत्कृष्ट कामगिरी करत दोन रौप्यपदकांची कमाई केली आणि भारतीय तिरंगा अभिमानाने फडकविला. धन्वीच्या या यशामागे प्रशिक्षक रोहिदास शिर्के, नवीन दवे तसेच ग्रँडमास्टर नीलेश जालनावाला यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रीडा क्षेत्रासह सामाजिक, शैक्षणिक आणि विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. देवगड तालुक्यासाठी ही अभिमानास्पद बाब मानली जात असून, भविष्यातही ती आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी आणखी मोठी कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.














