बाळकृष्ण पेडणेकरचा 'इंटरनॅशनल मास्टर' पर्णाली धारीयावर रोमहर्षक विजय

Edited by: विनायक गांवस
Published on: March 24, 2026 19:46 PM
views 17  views

सावंतवाडी : सातव्या ताराबाई शिंदे राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आघाडीचा राष्ट्रीय बुदधिबळ खेळाडू बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर याने चोवीसावा क्रमांक पटकावला. नेरुळ, नवी मुंबई येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवनमध्ये रविवार दि.बावीस मार्च रोजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. भारतातील विविध राज्यातील पाचशे वीस खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीचे आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर आणि राजेश विरनोडकर या दोन विदयार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. बाळकृष्णला रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या विजयाबरोबरच बाळकृष्णने राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत विजयाची मालिका सुरुच ठेवली आहे.

विशेष म्हणजे या स्पर्धेत बाळकृष्णने "वुमन इंटरनॅशनल मास्टर" पर्णाली धारीयावर रोमहर्षक विजयाची नोंद केली! चुरशीच्या सामन्यात बाळकृष्णने एशियन गोल्ड मेडलिस्ट पर्णालीला कोणतीही संधी दिली नाही. "इंटरनॅशनल मास्टर" खेळाडूवर विजय मिळवणारा बाळकृष्ण हा कोकणातील पहिला खेळाडू ठरला आहे. स्पर्धेत बाळकृष्णने नऊ राऊंड्समध्ये सात राऊंड्स जिंकून सात गुण केले. तसेच आपल्या आंतरराष्ट्रीय रेटिंगमध्ये सदतीस पाॅईंट्सची वाढ केली. राजेश विरनोडकर याने आंतरराष्ट्रीय रेटिंगमध्ये सोळा पाॅईंट्सची वाढ केली. डब्ल्यु.आय.एम. पर्णाली धारीया आणि तीचे पती नॅशनल मास्टर, यु ट्युबर आणि "चेस असिस्टचे" संस्थापक साहिल टिक्कू यांनी बाळकृष्णचे कौतुक करतानाच त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यापूर्वी "चेसबेस इंडियाचे" संस्थापक सागर शहा यांनी देखील बाळकृष्णचे कौतुक केले आहे. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष, ज्येष्ठ प्रशिक्षक श्री.कौस्तुभ पेडणेकर आणि राष्ट्रीय प्रशिक्षक श्री.उत्कर्ष लोमटे सरांच्या मार्गदर्शनाखाली बाळकृष्णने हे यश मिळवले आहे. सर्व स्तरातून बाळकृष्णचे कौतुक करण्यात येत आहे.