LIVE UPDATES

अस्मिता लीग टॅलेंट सर्चची सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३० नोव्हेंबरला निवड चाचणी

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: November 20, 2025 18:48 PM
views 209  views

सिंधुदुर्गनगरी : स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया आणि अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “अस्मिता लीग – टॅलेंट सर्च” कार्यक्रमासाठी संपूर्ण देशातील ३०० जिल्ह्यांची निवड झाली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही त्यात समावेश आहे. जिल्ह्यातील मुलींना अॅथलेटिक्समधील कौशल्य दाखविण्याची ही महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे.

१४ वर्षांखालील आणि १६ वर्षांखालील मुलींसाठी विविध अॅथलेटिक्स प्रकारांत निवड चाचणी घेण्यात येणार असून संबंधित वयोगटांसाठी निश्चित जन्मतारीख प्रमाणेच स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

१४ वर्षांखालील मुलींसाठी तीन प्रकारचे ट्रायाथलॉन (A, B, C) पैकी कोणताही एक प्रकार निवडणे बंधनकारक असून यासोबतच किड्स जेव्हलिन (भाला फेक) हा इव्हेंटही अनिवार्य आहे. १६ वर्षांखालील गटातील मुलींसाठी 60 मीटर, 600 मीटर धावणे, उंच व लांब उडी, थाळी फेक, 3 किलो गोळाफेक व 500 ग्रॅम भाला फेक असे सात प्रकार ठेवण्यात आले असून त्यापैकी कोणतेही दोन इव्हेंट निवडण्याची मुभा देण्यात आली आहे.

या निवड चाचणीकरिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना प्रमाणपत्र व पदक देण्यात येणार आहे.

ही स्पर्धा ३० नोव्हेंबर २०२५ रोजी क्रीडा संकुल, ओरोस (ता. कुडाळ) येथे होणार असून जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील मुलींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कल्पना तेंडुलकर (सचिव), रणजितसिंग राणे (अध्यक्ष) व आयोजक बाळकृष्ण कदम यांनी केले आहे.