LIVE UPDATES

नौकेवरील खलाशाचा आकस्मिक मृत्यू

देवगड बंदरातील ‘हेमावती’ नौकेवरील घटना
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 28, 2026 10:58 AM
views 45  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

देवगड : मालवण सर्जेकोट येथील भिवा आत्माराम आडकर (६०) यांच्या देवगड बंदरातील 'हेमावती' या नौकेवरील खलाशी संतोष पांडुरंग माईण (वय ४८, रा. कुंभारवाडा- धारावी, सध्या रा. देवगड बंदर) याचे रविवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास आकस्मिक निधन झाले. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवण सर्जेकोट येथील भिवा आडकर यांच्या देवगड बंदरात असलेल्या हेमावती या नौकेवर संतोष माईण हा खलाशी म्हणून कामास होता. या नौकेवरील इतर सर्व खलाशी हे गणपती सणानिमित्त गावी गेले होते. तर संतोष माईण हा नौकेचे तांडेल किशोर सारंग यांच्या घरी गेला होता. १३ सप्टेंबर रोजी संतोष माईण हा पुन्हा देवगड बंदरात नौकेवर राहण्यास आला होता. 

रविवारी दुपारी १०.३० वाजण्याच्या सुमारास नौका मालक भिवा आडकर हे नौकेवर आले असता खलाशी संतोष माईण हा नौकेवर पडलेल्या अवस्थेत दिसला. त्याच्या तोंडातून फेस येऊन तोंड वाकडे झालेले दिसले. त्यामुळे आडकर यांनी त्याला तात्काळ देवगड ग्रामीण  रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी नौका मालक भिवा आडकर यांनी देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली असून फिर्यादीनुसार घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सावंत करीत आहेत.