
देवगड : तळेरे ते नाडण या प्रवासादरम्यान सुमारे ९ ते १० लाख रुपये किमतीचे दागिने असलेली बॅग सापडूनही ती स्वतःकडे न ठेवता प्रामाणिकपणे संबंधित मालकाकडे परत करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचारी प्रसाद सुरेश पाळेकर यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नाडण, ता. देवगड येथील तसेच विजयदुर्ग पोलीस ठाण्यात कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले उमेश दत्तात्रय घाडी यांची प्रवासादरम्यान दागिने असलेली बॅग हरवली होती. ही बॅग प्रसाद पाळेकर यांना सापडली. बॅगेमध्ये अंदाजे ९ ते १० लाख रुपये किमतीचे दागिने असल्याचे समोर आले.
पाळेकर यांनी कोणताही मोह न ठेवता ही बॅग तिच्या मालकाचा शोध घेऊन त्यांच्याकडे सुरक्षितपणे परत केली.प्रसाद पाळेकर यांच्या या प्रामाणिकपणाची दखल घेत पाळेकरवाडीचे सरपंच उदय पाळेकर यांनी त्यांचे आभार मानत सत्कार केला. तसेच भाजप पडेल मंडल अध्यक्ष महेश (बंड्या) नारकर यांनीही दूरध्वनीवरून प्रसाद पाळेकर यांचे कौतुक करून त्यांच्या प्रामाणिकपणाचे अभिनंदन केले.सुमारे १० लाख रुपये किमतीचे दागिने असलेली बॅग सापडल्यानंतरही ती प्रामाणिकपणे मालकाकडे परत करण्याची कृती समाजासमोर माणुसकी आणि प्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण करणारी ठरली आहे. त्यांच्या या कृतीचे परिसरातून कौतुक होत आहे.












