
चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील रेहेळ भागडी सकपाळवाडी स्टॉप येथे प्रवाशांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेली एसटी बसची निवारा शेड सध्या अत्यंत नादुरुस्त झाली असून, ती मृत्यूचा सापळा बनली आहे. या शेडच्या भिंतींना मोठे तडे गेले असून मधला मुख्य पिलर कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे. यामुळे येथे कधीही मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
सदर निवारा शेड रेहेल-भागडी वैजी ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असून सुमारे १० वर्षापूर्वी तिचे बांधकाम केले आहे. मात्र, सद्यःस्थितीमध्ये ती धोकादायक असून ग्रामपंचायतीने या एस टी निवारा शेडकडे लक्ष देऊन तातडीने तिची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
चिपळूण गुहागर मार्गावर भागाडीच्या पुढे आल्यावर महामार्गाच्या लगतच रेहेळ भागडी सकपाळवाडी येथे ही एस टी निवारा शेड आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दहा वर्षापूर्वी या निवारा शेडचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र, सद्यस्थिती पाहता या निवारा शेडची दुरवस्था झाली आहे. या इमारतीचा मुख्य पिलर कधीही कोसळू शकतो. भिंतीना तडा गेल्या असून पायाचा आतील भागही खचला आहे. प्रवास
या मार्गावरून प्रवास करताना शाळकरी मुले, नोकरदार वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक याच शेडचा आधार घेऊन बसची प्रतीक्षा करतात. मात्र, या जीर्ण व ढासळत चाललेल्या बांधकामामुळे प्रवाशांच्या जीवाला सतत धोका निर्माण झाला आहे.
पावसाळा किंवा इतर दिवसांत प्रवाशांना आसरा घेण्यासाठी असलेली ही एकमेव निवारा शेड आता असुरक्षित बनल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संबंधित यंत्रणा आणि ग्रामपंचायतीने या गंभीर बाबीची तातडीने दखल घ्यावी, तसेच धोकादायक ठरलेली ही शेड पाडून नवीन व बळकट निवारा शेड उभारावी, अशी मागणी ग्रामस्थ व प्रवाशांकडून होत आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाला जाग येईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












