दक्षिणेचा उद्या फैसला

केरळमध्ये 'डावे' गड राखणार..?
Edited by:
Published on: May 03, 2026 20:02 PM
views 115  views

भारताच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल उद्या जाहीर होत आहे. विशेषतः दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये काय घडणार, याकडे संपूर्ण देशाचे डोळे लागले आहेत. हिंदी भाषेला होणारा विरोध आणि 'द्रविडी' अस्मितेचे राजकारण या पार्श्वभूमीवर, या राज्यांमध्ये हिंदुत्वाचा विचार किती रुजला आणि प्रादेशिक पक्षांनी आपला गड कसा राखला, याचा फैसला उद्या होईल.

तामिळनाडूमध्ये 234 जागांसाठी झालेल्या मतदानात एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील डीएमके आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज एक्झिट पोल्सनी वर्तवला आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत अभिनेता विजय यांच्या 'तामिळगा वेट्री कळघम' या पक्षाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. DMK विरुद्ध AIADMK यांच्यात प्रमुख लढत पाहायला मिळणार आहे. विजय यांचा TVK पक्ष 18 ते 24 जागा जिंकण्याची शक्यता असून, यामुळे प्रस्थापित राजकारणासमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. तर भाजप नेते के. अण्णामलाई यांच्या यात्रेमुळे भाजपने इथे आपली मुळे घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

केरळमध्ये दर पाच वर्षांनी सत्तापालट होण्याची परंपरा आहे. गेल्या वेळी डाव्यांनी (LDF) ही परंपरा मोडीत काढली होती, मात्र यंदा 'यूडीएफ' (UDF) पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत मिळत आहेत. 140 पैकी 71 हा बहुमताचा आकडा आहे. पीपल्स पल्सच्या अंदाजानुसार काँग्रेस प्रणीत UDF ला 75-85 जागा मिळू शकतात.