
पणजी : गोवा राज्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासह नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याची सवय लावणे याला सरकारचे प्राधान्य असल्याची माहिती वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी दिली. कॅमेऱ्यांच्या माध्यमातून दंड वसूल करणे हा सरकारचा उद्देश नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच येत्या जानेवारीपर्यंत संपूर्ण राज्यभरात एआय कॅमेऱ्यांची नजर असणार असून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.
राज्यात कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शेकडो वाहतूक उल्लंघनांची चलने जारी होत आहेत. त्यामुळे पीयुसी केंद्राबाहेर चालकांची गर्दी तसेच विमा काढण्याचे प्रमाण वाढल्याने वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. प्रत्येक वाहनाचा विमा असणे आवश्यक असल्याचे मंत्री गुदिन्हो यांनी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात राज्यात 29 ठिकाणी एआय कॅमेरे बसविण्यात आले असून आणखी 29 ठिकाणी एआय कॅमेरे बसविण्याचे काम सुरु असल्याचेही मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.














