
सावंतवाडी : बेळगाव, कर्नाटक येथील सतीश अण्णा फॅन्स क्लबने आयोजित केलेल्या सहा लाख पन्नास हजार रुपये बक्षीसे असलेल्या चौथ्या सतीश अण्णा आंतरराष्ट्रीय फिडे रॅपिड रेटिंग स्पर्धेत सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांनी दमदार कामगिरी केली. भारतातील विविध राज्यातील चारशे खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन मुक्ताई ॲकेडमीचे सावंतवाडी व देवगड येथील आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर, हर्ष राऊळ, पुष्कर केळूसकर, पुर्वांक कोचरेकर, चिदानंद रेडकर यांच्यासह अथर्व वेंगुर्लेकर, आकाश वाटवे, तेजस वाटवे या विदयार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळ केला.
आठ विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थ्यांनी पारितोषिके मिळवून राष्ट्रीय स्तरावर मुक्ताई ॲकेडमीला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला लौकिक प्राप्त करुन दिला. मुक्ताई ॲकेडमी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कोकणातील एकमेव पारितोषिकप्राप्त ॲकेडमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अव्वल क्रमांकाचा राष्ट्रीय खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर याने संपूर्ण स्पर्धेत तिसावा क्रमांक पटकावला.
बाळकृष्णला रोख पारितोषिक आणि आकर्षक मेडल देऊन गौरविण्यात आले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या नऊ राऊंड्समध्ये बाळकृष्णने सहा राऊंड्स जिंकून सहा गुण मिळवले. बाळकृष्णसोबतच मुक्ताई ॲकेडमीच्या सावंतवाडी व देवगड येथील इतर विदयार्थ्यांनीही या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ केला. चौदा वर्षाखालील मुलांच्या गटात तेरा वर्षीय चिदानंद रेडकर याने पाच गुण मिळवून चौदावा क्रमांक, हर्ष राऊळ याने पाच गुण मिळवून पंधरावा क्रमांक आणि अथर्व वेंगुर्लेकर याने पाच गुण मिळवून एकोणीसावा क्रमांक मिळवला.
मुक्ताई ॲकेडमीचा सर्वात लहान नऊ वर्षाचा आंतरराष्ट्रीय रेटेड विदयार्थी पूर्वांक कोचरेकर याने पाच गुण मिळवून दहा वर्षाखालील गटात बारावा क्रमांक मिळवला. सर्व विजयी खेळाडूंना आकर्षक मेडल देऊन गौरविण्यात आले. ॲकेडमीचा सर्वात लहान सात वर्षाचा विदयार्थी आकाश वाटवे, तसेच पुष्कर केळूसकर आणि तेजस वाटवे या विदयार्थ्यांनी देखील चांगला खेळ करुन लढत दिली. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विदयार्थ्यांनी हे यश मिळवले. ॲकेडमीच्या सरचिटणीस सौ.स्नेहा पेडणेकर यांनी सर्व विदयार्थ्यांचे कौतुक करतानाच सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व स्तरातून विदयार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.












