
नवी दिल्ली : सामाजिक जबाबदारी आणि स्थानिक समुदायांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची दखल घेत M/s. Gogte Minerals, Redi Iron Ore Mines या कंपनीला प्रतिष्ठित FIMI–NMDC पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नवी दिल्ली येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात भारत सरकारच्या खनिज मंत्रालयाचे सचिव केशव चंद्र यांच्या हस्ते कंपनीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यास खनिज मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव तसेच FIMI ज्युरीच्या सदस्या डॉ. वीणा कुमारी डर्मल यांचीही उपस्थिती होती. स्थानिक समुदायांचे कल्याण, विकास आणि सक्षमीकरणासाठी कंपनीकडून करण्यात येणाऱ्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Gogte Minerals कडून शिक्षण, आरोग्यसेवा, पायाभूत सुविधा विकास, उपजीविका व रोजगाराच्या संधी, पर्यावरण जनजागृती तसेच स्थानिक नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांमुळे स्थानिक समुदायांमध्ये सकारात्मक आणि दीर्घकालीन सामाजिक परिणाम निर्माण करण्यास हातभार लागत आहे.
जबाबदार खनन म्हणजे केवळ खनिज उत्खनन नव्हे, तर स्थानिक समाज आणि पर्यावरणाप्रती असलेली जबाबदारीही महत्त्वाची आहे,’
या भूमिकेतून कंपनी सामाजिक विकासाला प्राधान्य देत आहे. स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या गरजा आणि विकासाच्या अपेक्षा लक्षात घेऊन विविध उपक्रम राबविले जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
हा पुरस्कार कंपनीचे व्यवस्थापन, कर्मचारी, भागीदार आणि स्थानिक समुदायातील हितधारक यांच्या सामूहिक प्रयत्नांना आणि सामाजिक बांधिलकीला मिळालेली पावती असल्याचे ‘गोगटे मिनरल्स’ ने म्हटले आहे.
या प्रतिष्ठित सन्मानाबद्दल कंपनीने FIMI आणि NMDC यांचे आभार व्यक्त केले.
भविष्यातही सामाजिक जबाबदारीच्या उपक्रमांना अधिक बळ देत शाश्वत आणि सर्वसमावेशक समुदाय विकासासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार कंपनीने व्यक्त केला आहे.










