LIVE UPDATES

CRPF Recruitment 2026 : सीआरपीएफमध्ये कॉन्स्टेबल-हेड कॉन्स्टेबलच्या ५२१ जागांसाठी भरती, 'या" तारखेपासून करता येणार अर्ज

CRPF Sports Quota Recruitment 2026 : सीआरपीएफद्वारे 'हेड कॉन्स्टेबल' आणि 'कॉन्स्टेबल' या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीसाठी पात्र पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेत पुरुष आणि महिला खेळाडूंना १२ ऑक्टोबर २०२६ पासून अर्ज करता येणार आहेत.
Edited by: Rajat Sawant
Published on: September 23, 2026 13:30 PM
views 65  views
CRPF Sports Quota Recruitment 2026

नवी दिल्ली : 'सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स' भारतातील सर्वात मोठे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. 'सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स'मार्फत 'स्पोर्ट्स कोटा' (२०२६) अंतर्गत ५२१ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेत पुरुष आणि महिला खेळाडूंना १२ ऑक्टोबर २०२६ पासून अर्ज करता येणार आहेत.

पदांच्या तपशीलासह शैक्षणिक पात्रता

सीआरपीएफद्वारे 'हेड कॉन्स्टेबल' आणि 'कॉन्स्टेबल' या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. हेड कॉन्स्टेबल पदासाठी १५० पुरुष व ३२ महिला अशा एकूण १८२ जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी (10+2) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

कॉन्स्टेबल पदासाठी २५८ पुरुष व ८१ महिला अशा एकूण ३३९ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी उमेदवारांनी किमान १० वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

क्रीडा पात्रता

उमेदवारांनी मागील दोन वर्षांत राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्पर्धा, आंतर-विद्यापीठीय स्पर्धा किंवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये देशाचे किंवा राज्याचे प्रतिनिधित्व केलेले असावे आणि विशिष्ट स्थान किंवा पदक मिळवलेले असावे.

भरतीसाठी वयोमर्यादा

१ ऑगस्ट २०२६ रोजी उमेदवारांचे वय १८ ते २३ वर्षांच्या दरम्यान असावे. नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील खेळाडूंना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. यात ओबीसीसाठी ८ वर्षे आणि एससी/एसटीसाठी १० वर्षे वयोमर्यादेत सवलत दिली आहे. 

वेतनश्रेणी

निवड झालेल्या हेड कॉन्स्टेबल यांना २५,५०० ते ८१,१०० रुपये (लेव्हल-४) आणि कॉन्स्टेबल यांना २१,७०० ते ६९,१०० रुपये (लेव्हल-३) या श्रेणीतील मासिक वेतन मिळेल. यासोबतच इतर सरकारी भत्तेही दिले जातील. 

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड लेखी परीक्षेऐवजी क्रीडा प्रमाणपत्रांचे गुण, शारीरिक पात्रता चाचणी, क्रीडा चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या आधारे केली जाईल.

अर्ज शुल्क

सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १०० रुपये आहे तर महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे.

'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

५२१ पदांसाठी ऑनलाइन अर्ज १२ ऑक्टोबर २०२६ पासून सकाळी ९ वाजल्यापासून करता येणार आहेत. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ नोव्हेंबर २०२६ रात्री ११:५९ वाजेपर्यंत राहणार आहे. ऑनलाइन अर्जात सुधारणा करण्याची अंतिम तारीख १२ नोव्हेंबर २०२६ ते १४ नोव्हेंबर २०२६ असणार आहे.

येथे करा अर्ज

पात्र खेळाडू १२ ऑक्टोबरपासून अधिकृत भरती पोर्टल rect.crpf.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.