
देवगड : किरकोळ घरगुती वादातून सख्ख्या भावाला लाकडी बांबूने मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी हिंदळे मोर्वेवाडी येथील शंकर अनंत धुरत (वय ५५), त्याची पत्नी प्रियांका शंकर धुरत (वय ४५) व मुलगा ओजस शंकर धुरत (वय २२) या संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदळे मोर्वेवाडी येथील शंकर धुरत व संतोष अनंत धुरत (वय ४९) यांच्यात घरगुती वाद आहेत.
संतोष धुरत यांचे कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्य आहे. सणासुदीला ते गावी येतात. बुधवारी सकाळी संशयित शंकर याने संतोष यांना घराबाहेर असलेली लाकडी खोप काढून ठेवा, असे सांगितले. या किरकोळ विषयावरून त्यांच्यात वाद सुरू झाले. या वादात संशयित शंकरने संतोष यांच्या डोक्यावर लाकडी बांबूने मारहाण केली. तर शंकरची पत्नी प्रियांका व मुलगा ओजस या संशयितांनी संतोष यांना शिवीगाळ केली.
याप्रकरणी संतोष धुरत यांनी देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली असून या फिर्यादीनुसार देवगड पोलिसांनी तीनही संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता ११८ (१), ३५२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस हवालदार गणपती गावडे करीत आहेत.
दरम्यान, या घटनेत परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्यात आली असल्याची माहिती देवगड पोलिसांनी दिली असून सदर फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
ताजी बातमी
View all














