
मुंबई : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने देशातील साहसी दुचाकीस्वारांसाठी (adventure enthusiasts) एक्सआर 300 एल 'XR300L' आणि एक्सआर 300 रॅली 'XR300 Rally' या दोन दमदार नवीन बाईक्स बाजारात लॉन्च केल्या आहेत.
अलीकडच्या काळात भारतात हलक्या वजनाच्या ॲडव्हेंचर बाईक्सची लोकप्रियता वेगाने वाढली आहे. होंडाच्या या दोन नवीन बाईक्स नेमीच्या दैनंदिन वापरासाठी आणि ऑफ रोडींगच्या गरजा लक्षात घेऊन लॉन्च करण्यात आल्या आहेत. कंपनीने एक्सआर 300 एल (XR300L) ची किंमत १.८३ लाख रुपये (एक्स-शोरूम) आणि एक्सआर 300 रॅली (XR300 Rally) ची किंमत २.०८ लाख रुपये निश्चित केली आहे.
बाईक्सचा लूक
कंपनीने एक्सआर 300 एल आणि एक्सआर 300 रॅली या दोन्ही बाईक्स एकाच प्लॅटफॉर्मवर आणि एकाच इंजिनसह बनवल्या आहेत. तरीही, त्यांचा लूक आणि फिचर्स वेगळे आहेत. होंडा एक्सआर 300 एल ही विशेषतः खडबडीत भूप्रदेश आणि कच्च्या रस्त्यांवर चालवण्यासाठी, म्हणजेच प्रामुख्याने ऑफ-रोडिंगसाठी डिझाइन केली गेली आहे. तर एक्सआर 300 रॅली मॉडेलमध्ये समोरच्या बाजूला मोठे फेअरिंग, उंच विंडस्क्रीन आणि अतिरिक्त बॉडीवर्क देण्यात आले आहे. ही रचना हायवेवरील लांबच्या प्रवासात रायडरचे वाऱ्याच्या वेगापासून संरक्षण करते आणि प्रवास आरामदायी बनवते.
इंजिनच्या बाबतीत माहिती
होंडाची इंजिन्स त्यांच्या जबरदस्त परफॉर्मंससाठी ओळखली जातात. परफॉर्मंसचा विचार करता दोन्ही बाईक्समध्ये २८६ सीसीचे, लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन सुमारे २४.३ बीएचपी पॉवर आणि २६.५ एनएम टॉर्क जनरेट करते आणि त्याला ६ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आलेला आहे. इतर ॲडव्हेंचर बाईक्सच्या तुलनेत या बाईक्सचे वजन खूपच कमी आहे.
चांगले सस्पेन्शन आणि हार्डवेअर
सस्पेन्शन आणि हार्डवेअरच्या बाबतीत कंपनीने बाईकच्या समोरच्या बाजूला 'अपसाइड-डाऊन' फोर्क्स आणि मागील बाजूस 'मोनोशॉक' सस्पेन्शन देण्यात आले आहेत. या दोन्हीमध्ये 'लॉन्ग ट्रॅव्हल'ची सुविधा असल्याने खड्ड्यांच्या रस्त्यांवरही आरामदायी प्रवास करता येतो.
तसेच बाईकच्या दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक्स, स्पोक व्हील्स आणि 'ऑल-टेरेन' टायर्स देण्यात आले आहेत. या रचनेमुळे तुम्ही खडबडीत रस्ते, खडकाळ मार्ग किंवा चिखलाच्या वाटांवरून आत्मविश्वासाने आणि सहजतेने गाडी चालवू शकता.














