
दोडामार्ग : नगरपंचायतची सभा झाल्यानंतर नितीन मणेरीकरांनी घेतलेली पत्रकार परिषद ही स्क्रिप्टेड पत्रकार परिषद होती. पडद्या मागच्या सुत्रधाराने सर्व लिहून दिले आणि तसे त्याने वाचून दाखवले. त्यामुळे याचा पडद्या मागचा सूत्रधार कोण आहे हे संपूर्ण जनतेला माहित आहे.असा घणाघाती आरोप नानचे यांनी केला. एवढ्यावरच न थांबता येणारी निवडणूक संतोष नानचे मुळे डोईजड होणार आणि मला शहरातील वाढता जनाधार आणि नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून काहींच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे माझी बदनामी करण्यासाठी नितीन मणेरीकर यांना प्यादा म्हणून पुढे केले जात आहे. असा जोरदार पलटवार भाजपचे गटनेते तथा नगरसेवक नितीन मणेरीकर यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचेच विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांनी आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
नानचे पुढे म्हणाले की, दोडामार्ग शहरात मणेरीकर कुटुंबातील अनेक व्यक्ती आहेत. ते शांत, संयमी, प्रतिष्ठित असून आपापला व्यवसाय प्रामाणिकपणे करीत आहेत. मात्र त्यांच्यात एकच बोगस व डुप्लिकेट मणेरीकर असल्याचा माझा आरोप आहे, असे म्हणत नानचे यांनी नितीन मणेरीकर यांच्यावर थेट निशाणा साधला. माझ्यावर आरोप करण्याशिवाय सध्या त्यांच्याकडे दुसरे काहीही उरलेले नाही. निवडणूक जवळ येत असल्याचे लक्षात घेऊन माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र शहरातील नागरिकांना आता सत्य काय आहे, हे समजू लागले आहे असेही नानचे म्हणालेत.
सभेत बोलायचे सोडून बाहेर जाऊन पत्रकार परिषद.....
सर्वसाधारण सभेत आपण प्रशासनाच्या कामकाजावर आक्षेप घेतला होता, असे स्पष्ट करत नानचे म्हणाले, चुकीच्या पद्धतीने सुरू असलेली विकासकामे, नगरसेवकांना विश्वासात न घेता अधिकाऱ्यांकडून केली जाणारी कामे आणि कोट्यवधी रुपयांच्या निधीचा होणारा अपव्यय यावर मी आवाज उठविला. मी माझ्या पक्षातील एकाही नगरसेवकावर टीका केली नव्हती. माझा रोश प्रशासनावर होता. नितीन मणेरीकर स्वतः सर्वसाधारण सभेला उपस्थित होते. सभेतच त्यांनी माझ्या भूमिकेला उत्तर द्यायला हवे होते. मात्र सभेत बोलण्याऐवजी ते बाहेर गेले आणि पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर आरोप केले. हा प्रकार योग्य नाही अशी टीका नानचे यांनी केली.
सूत्रधाराने आयत्या बिळावर नागोबा होऊन खूप मजा लुटली.....
मणेरीकरांच्या पत्रकार परिषदेमागे खरा सूत्रधार कोण आहे हे मला माहिती आहे. आतापर्यंत आयत्या बिळावर नागोबा होऊन खूप मजा केलीस. मात्र येणाऱ्या काळात हे कठीण जाणार आहे. स्वतःचा लाभ लक्षात घेऊन अनेक कामे करण्यात आली. आता शहरातील नागरिकांनाही या मानसिकतेची जाणीव होऊ लागली आहे. ही तुझी शेवटची धडपड आहे असा टोला नानचे यांनी नाव नघेता लगावला. सर्वसाधारण सभेत मी पक्षाचे नाव घेतले नाही, पक्षावर टीका केली नाही आणि पक्षातील कोणत्याही नगरसेवकावर टीका केली नाही. तरीही माझ्यावर पक्षविरोधी असल्याचे चित्र निर्माण करून पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. उलट पक्षाची बदनामी कोण करीत आहे, याचा विचार मणेरीकरांनी करावा असे नानचे म्हणाले. या प्रकाराबाबत पक्षाच्या वरिष्ठांकडे लवकरच तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जुन्या आरोपांचीच स्क्रिप्ट पुन्हा वाचली...
मागील नगरपंचायत निवडणुकीच्या काळात आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांचीच पुनरावृत्ती मणेरीकरांनी केली असल्याचे नानचे यांनी सांगितले. त्यावेळी माझ्यावर झालेल्या आरोपांची चौकशी झाली असून प्रशासनाकडून मला क्लीन चिट मिळाली आहे. त्यामुळे त्याच विषयावर पुन्हा आरोप करून राजकीय वातावरण तापविण्यात काहीही तथ्य नाही. कारण माझ्यावर बोलल्यासाठी त्यांच्याकडे काही नाही म्हणून बोगस ठेकेदारी आणि भ्रष्टाचाराच्या प्रवृत्तीची माणसे विनाकारण माझ्यावर आरोप करीत आहेत. त्यांनी आधी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे आणि त्यानंतर माझ्यावर बोलावे असा हल्लाबोलही नानचे यांनी केला.
गटनेते म्हणून किती बैठका घेतल्या?....
नितीन मणेरीकर हे भाजपचे गटनेते असल्याचा उल्लेख करत नानचे यांनी त्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गटनेता म्हणून त्यांनी आतापर्यंत किती वेळा सर्व नगरसेवकांची बैठक घेतली? पक्षाची ध्येयधोरणे शहरातील विकासासाठी काय आहेत, हे नगरसेवकांना किती वेळा सांगितले? शहराच्या दृष्टीने त्यांनी कोणते ठोस विकासकाम केले, हे त्यांनी दाखवावे असे आव्हान नानचे यांनी दिले.
विसर्जन तळ्याच्या कामाचीही चौकशी व्हावी....
मणेरीकरांच्या पोटठेकेदारीवरूनही नानचे म्हणाले की, सावंतवाडा गणपती विसर्जनासाठी तळ्याजवळ करण्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या कामाचा उल्लेख करत त्यांनी कामाच्या दर्जावर आक्षेप घेतला. काम पूर्ण झाल्यानंतर अल्पावधीतच तेथे मोठ्या प्रमाणात जंगली झाडे निर्माण झाली. काम चुकीच्या पद्धतीने झाले असल्याचा आमचा आरोप आहे. तळ्याच्या सुशोभीकरणासाठी वापरण्यात आलेल्या जांभा दगडाबाबतही प्रश्न आहेत. एका विहिरीतून काढलेले दगड नगरपंचायतीच्या ताब्यात देणे अपेक्षित असताना तसे झाले का, याची चौकशी झाली पाहिजे असे नानचे म्हणाले. काही कामांच्या अंदाजपत्रकांमध्ये अनावश्यक वाढ करण्यात आल्याचा आमचा आरोप आहे. संबंधित कामांची कागदपत्रे आणि प्रत्यक्ष काम यांची तपासणी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
बोगस ठेकेदारी करत नसाल तर देवासमोर हात ठेवा....
ठेकेदारीच्या आरोपांवरून नानचे यांनी मणेरीकरांना थेट आव्हान देत म्हणाले, तुम्ही बोगस ठेकेदारी करीत नाही, पोटठेकेदारी करीत नाही, असा दावा असेल तर दोडामार्गचे आराध्यदैवत श्री पिंपळेश्वराच्या मंदिरात या. नारळ ठेवून त्यावर हात ठेवून हे सांगण्याची तयारी दाखवा. आम्हीही तिथे येतो. हे आमचे खुले आव्हान आहे, असे नानचे यांनी सांगितले. नगरपंचायतीतील विविध विकासकामे निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप करत त्यांनी ‘नमो गार्डन’च्या कामाचीही लवकरच पोलखोल करणार, असा इशारा दिला.
मणेरीकर यांनी एका बिल्डरला देखील फसविले.....
दरम्यान, नानचे म्हणाले की, शहरातील एका इमारत प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित प्रकल्पातील पूर्वीचे विकासक श्री. गवस यांच्या आजारपणाचा फायदा घेत त्यांचा प्रकल्प बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संबंधित बिल्डरची सुमारे ७० लाख रुपयांची ठरलेली रक्कम अद्याप मिळालेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित गवस माझ्या संपर्कात असून त्यांनी आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे मणेरीकर यांनी स्वतःचे पहावे असे नानचे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
केलेले आरोप सिद्ध करून दाखवा! – रामचंद्र ठाकूर
दरम्यान,पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले नगरसेवक रामचंद्र ठाकूर यांनीही नितीन मणेरीकर यांनी केलेले आरोप फेटाळून लावत त्यांच्यावरच प्रतिआरोप केले. मी कोणत्याही बिल्डर किंवा ठेकेदाराकडून एक रुपयाही घेतलेला नाही. माझे फ्लॅट मी कोणाकडूनही मोफत घेतलेले नाहीत. कोणत्याही परवानगीसाठी पैसे घेतलेले नाहीत. माझ्यावर करण्यात आलेले आरोप मणेरीकरांनी सिद्ध करून दाखवावेत, असे खुले आव्हान ठाकूर यांनी दिले. माझे घर सर्व आवश्यक परवानग्या घेऊन बांधण्यात आले आहे. ते अनधिकृत असल्याचा आरोप केला जात असेल तर तोही त्यांनी सिद्ध करून दाखवावा. उलट त्यांच्या इमारत प्रकल्पातील कथित अनियमितता आपण कागदपत्रांसह दाखवू शकतो तसेच ते राहतात ते घरचं अधिक बांधकामने अनधिकृत असल्याचे ठाकूर म्हणाले.












