LIVE UPDATES

sindhudurg News: ​"सहकारात 'युथ पॉवर'!

युवकांपासून ग्रामीण महिलांपर्यंत मनीष दळवींचा युथ-फ्रेंडली 'न्यू जन कनेक्ट' फॉर्म्युला
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 28, 2026 07:58 PM
views 31  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्ग : सहकार क्षेत्राची ताकद ही केवळ पारंपारीक सभासद आणि जुन्या संस्थांच्या सहभागात नसून नव्या पिढीला सहकाराच्या मुख्य प्रवाहात जोडण्यात आहे, हे लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी ‘न्यू जन कनेक्ट’ या अभिनव उपक्रमाला सुरुवात केली. बदलत्या काळानुसार युवकांच्या बँकिंगच्या गरजा, त्यांच्या डिजिटल सवयी आणि आधुनिक आर्थिक व्यवहारांची पद्धत लक्षात घेऊन या उपक्रमाची आखणी करण्यात आली.

आजची युवा पिढी पारंपारीक  बँकिंगपेक्षा डिजिटल आणि तत्काळ सेवांना अधिक पसंती देते. ही बदलती मानसिकता लक्षात घेऊन डिजिटल बँकिंग, आधुनिक बँकिंग सेवा, ऑनलाइन व्यवहार आणि युवकाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून तरुणांचा बँकेशी संवाद वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे सहकार क्षेत्राकडे केवळ पारंपारीक संस्था म्हणून पाहण्याऐवजी आधुनिक आर्थिक व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून पाहण्याची नवी दृष्टी निर्माण झाली. ‘न्यू जन कनेक्ट’च्या माध्यमातून पारंपरिक सहकाराची मूल्ये आणि आधुनिक बँकिंग तंत्रज्ञान यांची सांगड घालण्याचा करण्यात आला आहे. भविष्यातील ग्राहक, उद्योजक आणि व्यावसायिक म्हणून युवकांना बँकेशी जोडण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

बँकेच्या अंतर्गत प्रशासनातही अनेक वर्षांपासून रखडलेल्या महत्त्वाच्या बाबींना गती देण्यात आली. त्यामध्ये कर्मचारी भरतीचा प्रश्न विशेष महत्त्वाचा होता. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कर्मचारी भरती प्रक्रियेला प्राधान्य देण्यात आले. या भरती प्रक्रियेत जिल्ह्यातील स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील सुशिक्षित युवकांना आपल्या जिल्ह्यातच रोजगाराची संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. बँकेसाठी आवश्यक असलेले सक्षम मनुष्यबळ उपलब्ध होण्याबरोबरच स्थानिक युवकांची क्षमता सहकार क्षेत्राच्या विकासासाठी वापरली जाणार आहे. बँकेच्या वाढत्या कामकाजाचा विस्तार आणि भविष्यातील मनुष्यबळाची गरज लक्षात घेता कर्मचारी भरतीचा दुसरा टप्पाही राबविण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याबरोबरच बँकेच्या सेवा अधिक गतिमान आणि प्रभावी करण्यास मदत होणार आहे.

बँकिंग क्षेत्र झपाट्याने डिजिटल होत असताना जिल्हा बँकेनेही तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलली. संस्थांचे संगणकीकरण, कोअर बँकिंग व्यवस्थेची अधिक प्रभावी अंमलबजावणी, डायनॅमिक डे-एंड प्रणाली, ERP प्रणाली आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत बँकेने आधुनिक बँकिंगच्या दिशेने आपली वाटचाल मजबूत केली.

संगणकीकरणामुळे केवळ बँकेच्या अंतर्गत कामकाजाचा वेग वाढला नाही, तर ग्राहकांना मिळणाऱ्या सेवांमध्येही अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न झाला. शाखा, विकास संस्था आणि प्राथमिक सहकारी संस्थांच्या पातळीवर तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने व्यवहार अधिक वेगवान आणि व्यवस्थापन अधिक परिणामकारक होण्यास मदत झाली.

युवकांबरोबर ग्रामीण भागातील महिलांना बँकिंगच्या मुख्य प्रवाहात आणणे हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. अनेक ग्रामीण महिलांना बँकेच्या शाखेत जाऊन व्यवहार करणे, डिजिटल व्यवहार समजून घेणे किंवा आर्थिक सेवांचा वापर करणे सहज शक्य होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन ‘बँक सखी’ उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमामुळे बँकिंग सेवा गावागावात आणि महिलांच्या अधिक जवळ पोहोचण्यास मदत झाली. महिलांना आर्थिक व्यवहारांची माहिती मिळण्याबरोबरच बचत, कर्ज, डिजिटल व्यवहार आणि बँकिंग सेवांचा वापर करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळू लागले. ‘बँक सखी’ ही केवळ बँकिंग सेवा गावापर्यंत पोहोचविणारी व्यवस्था न राहता ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे माध्यम बनण्याच्या दिशेने मनिष दळवी यांनी पाऊल उचलले आहे.