
देवगड : महावितरणकडून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह छोटे व्यावसायिक, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटन व्यावसायिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप महाराष्ट्र लोकाधिकार समितीने केला आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समितीच्या वतीने बुधवार, ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता महावितरण कार्यालयासमोर निषेध व धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष प्रसाद करंदीकर यांनी दिली.
समितीने दिलेल्या निवेदनानुसार, वीज ही दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक सुविधा असून विविध व्यवसायांसाठीही ती महत्त्वाची आहे. विशेषतः पर्यटन व्यवसाय वीजपुरवठ्यावर अवलंबून असतो. मात्र, ठोस पूर्वसूचना न देता वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे समितीने म्हटले आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे हॉटेलमधील दैनंदिन कामकाज, खाद्यपदार्थांची तयारी, पाणीपुरवठा आणि ऑनलाइन व्यवहारांवर परिणाम होतो. दुकाने तसेच अन्य व्यावसायिक कामकाजातही अडथळे निर्माण होतात. पर्यटन हंगामात अशा प्रकारे वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यटकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. मोठ्या उद्योगांप्रमाणे पर्यायी वीजव्यवस्था उभारणे प्रत्येक छोट्या व्यावसायिकाला आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याने त्यांच्या अडचणी वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर महावितरणच्या कारभाराचा निषेध नोंदवून वीजपुरवठा नियमित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या आंदोलनात देवगड-जामसंडे परिसरातील नागरिक, व्यापारी, ग्राहक आणि पर्यटन व्यावसायिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र लोकाधिकार समितीने केले आहे.
हे आंदोलन लोकशाही मार्गाने आणि शांततेत करण्यात येणार असून, स्थानिक कायदा-सुव्यवस्था व सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे. आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेवर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.











