
सिंधुदुर्ग : कलेचा वारसा असलेल्या कोकण भूमीनं महाराष्ट्राला आणि देशाला अनेक दिग्गज कलाकार दिले आहेत. आता याच मातीतून आणखी एक नवा तारा लख्खपणे उजळून निघाला आहे. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी (उत्कर्षनगर) येथील रहिवासी आणि कुडाळ हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवीत शिकणारा आरव सुरेश आईर हा अवघ्या ११ वर्षांचा प्रतिभावान बालकलाकार आता थेट मोठ्या पडद्यावर आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या १२ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या ‘आदि अनंत’ या बहुचर्चित मराठी चित्रपटात तो चक्क मराठी चित्रपटसृष्टीचे भीष्मपितामह ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे!
आजोबा-नातवाच्या हळव्या नात्याची हृदयस्पर्शी गाथा
महेश लिमये यांच्या दिग्दर्शनाखाली आणि अष्टपैलू संकर्षण कऱ्हाडे यांच्या तुफान लेखनशैलीतून साकारलेला ‘आदि अनंत’ हा चित्रपट आजोबा आणि नातू यांच्यातील प्रेम, जिव्हाळा अन् भावनिक नातेसंबंधांची वीण उलगडणारा आहे. या चित्रपटात अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्यासह सखी गोखले, वैदेही परशुरामी, कविता लाड, श्रीरंग गोडबोले आणि गीतकार गुरु ठाकूर या दिग्गज कलाकारांची फौज आहे. या ताफ्यात आपल्या सहजसुंदर अभिनयाची जोड देत चिमुरड्या आरवने मानाचे स्थान मिळवले आहे, ज्यामुळे कुडाळसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण पसरले आहे.
पडतेवाडी शाळेतून पहिली ते चौथीचे धडे गिरवल्यानंतर सध्या कुडाळ हायस्कूलमध्ये ५ वीत शिकणाऱ्या आरवचा हा प्रवास थक्क करणारा आहे. चिमणी पाखर डान्स अकादमीमध्ये नृत्यदिग्दर्शक रवी कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने अभिनय आणि नृत्याचे बाळकडू घेतले. झी मराठीवरील गाजलेला शो ‘ड्रामा ज्युनिअर्स २०२४’ मध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारत त्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच झी चित्र गौरव सोहळ्यात अभिनेता सिद्धार्थ जाधव यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याचा मान त्याला मिळाला.
‘मुंजा’, ‘सोरट’, ‘दशावतार’ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांसोबतच सन मराठीवरील ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ मालिकेत साकारलेली ‘दिघ्या’ची भूमिका प्रेक्षकांच्या मनावर कायमची कोरली गेली आहे. ‘विण दोघातली ही तुटेना’ मधील ‘गणू’, तसेच ‘अंधारमाया’, ‘अथांग’, ‘कल्की’ या वेबसीरिज आणि योगेश जाधव यांच्या ‘नटराजा’ शॉर्टफिल्ममध्ये त्याने मुख्य भूमिका गाजवली आहे. नाट्यक्षेत्रातही अक्षय कासले यांच्यासोबत काम करत ‘धीम टॅंक डिटॅंग’ एकांकिकेसाठी ‘अटल करंडक २०२३’चा उत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार त्याने पटकावला आहे.
नाटक, दूरचित्रवाणी मालिका, वेबसीरिज ते थेट सिनेमा असा चौफेर चौकार मारणारा आरव आता ‘आदि अनंत’ चित्रपटाच्या माध्यमातून एका नव्या सुवर्णमध्यावर येऊन पोहोचला आहे. कोकणाचा हा लाडका बालकलाकार मोठ्या पडद्यावर काय कमाल दाखवतो, हे पाहण्यासाठी १२ नोव्हेंबरची उत्सुकता संपूर्ण सिंधुदुर्गवासीयांना लागली आहे. आरवच्या या ऐतिहासिक भरारीबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे!












