LIVE UPDATES

Floating Solar : आता जलाशयांवर उभारणार सौरउर्जा प्रकल्पांचे जाळे, 'प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजने'ला केंद्र सरकारची मंजूरी

पाच वर्षांच्या कालावधीत राबविणार योजना
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 31, 2026 19:59 PM
views 111  views

PM Surya Sarovar Yojana : केंद्रीय सरकारने ऊर्जा साठवणूक प्रणालींसह तरंगत्या सौर उर्जा (floating solar photovoltaic) प्रकल्पांच्या विकासासाठी 'प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेस' मंजूरी दिली आहे. नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकी हा निर्णय घेण्यात आला. या योजनेबाबत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती जाहीर केली.

मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नमूद केले की, देशातील औद्योगिक तलाव, धरणांवर तरंगत्या सौरउर्जा प्रकल्पांचे जाळे उभारण्याच्या दृष्टीने सरकारने प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना सुरु केली आहे. ५,०७० कोटी रुपयांच्या एकूण तरतुदीसह या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ५,००० मेगावॅट क्षमतेचे तरंगते सौर फोटोव्होल्टेइक प्रकल्प विकसित केले जातील. या प्रकल्पांमध्ये ऊर्जा साठवणूक प्रणालींचा समावेश असेल. ज्यांची किमान साठवणूक क्षमता दोन तासांची आणि एकूण ऊर्जा साठवणूक क्षमता १०,००० मेगावॅट-तास असेल. या योजनेत जलाशय, कालवे आणि औद्योगिक तलावांचा वापर केला जाणार असल्याने यासाठी कोणत्याही अतिरिक्त जमिनीच्या संपादनाची आवश्यकता भासणार नाही. प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना पाच वर्षांच्या कालावधीत राबविली जाईल.