
नवी दिल्ली : गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने अमूलच्या ताज्या पॅकबंद दुधाच्या किमतीत सुमारे ४ ते ५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन दर १२ नोव्हेंबर २०२६ पासून देशभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये लागू होतील.
दुधाचा पुरवठा कमी झाल्यामुळे आणि खरेदी खर्च वाढल्यामुळे मदर डेअरी आणि अमूलसारख्या डेअरी ब्रँड्सनी दुधाच्या किमतीत प्रति लिटर २ ते ६ रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवे दर १२ नोव्हेंबरपासून प्रभावी होतील. परिणामी, ग्राहकांना आता दुधासाठी अधिक पैसे मोजावे लागतील.
गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनच्या मते, या दरवाढीचे मुख्य कारण म्हणजे उत्पादन आणि प्रक्रिया खर्चात झालेली सततची वाढ. गेल्या वर्षभरात कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. यामध्ये हिरवा व सुका चारा, पशुखाद्यात वापरली जाणारी पेंड, मका आणि मोलॅसिस यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, दुधाच्या पॅकेजिंगसाठी लागणारे फिल्म आणि इंधनाच्या खर्चातही वाढ झाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुधाच्या प्रकारानुसार ही दरवाढ वेगवेगळी असेल. टोंड दुधाच्या किमतीत प्रति लिटर २ रुपयांनी, फुल-क्रीम दुधात प्रति लिटर ४ रुपयांनी आणि फुल-क्रीम म्हशीच्या दुधात प्रति लिटर ६ रुपयांनी वाढ होईल. बल्क वेंडिंग मशिनद्वारे विकल्या जाणाऱ्या टोंड दुधाची किंमत प्रति लिटर ५८ रुपयांवरून ६० रुपये होईल. पॅकबंद फुल-क्रीम दुधाची किंमत प्रति लिटर ७२ रुपयांवरून ७६ रुपये, तर पॅकबंद टोंड दुधाची किंमत ६० रुपयांवरून ६२ रुपये होईल.
फुल-क्रीम म्हशीच्या दुधाची किंमत प्रति लिटर ८० रुपयांवरून ८६ रुपये होईल. मदर डेअरी देखील त्यांच्या डबल-टोंड दुधाच्या किमतीत प्रति लिटर ५४ रुपयांवरून ५६ रुपयांपर्यंत वाढ करणार आहे, तर गाईच्या दुधाची किंमत ६२ रुपयांवरून ६५ रुपये होईल.
Amul to hike fresh milk pouch prices by up to 5% across India from tomorrow Read @ANI Story | https://t.co/GqO1MnLl7D #Amul #MilkPouchPrices #India https://t.co/57HJ0bRyJq
— ANI Digital (@ani_digital) November 11, 2026
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








