
नवी दिल्ली : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदारांनी पक्षाची साथ सोडली असून ते सत्ताधारी पक्ष नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये (एनडीपीपी) सामील झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या पक्षाचं विधानसभेतील संख्याबळ वाढलं असून एनडीपीपीला विधानसभेत पूर्ण बहुमत मिळालं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सात आमदारांच्या नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमधील विलीनीकरणामुळे एनडीपीपीच्या आमदारांची संख्या आता २५ वरून ३२ झाली आहे. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत एनडीपीपी, भाजपानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्ष तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.