
सिंधुदुर्ग : गणेशोत्सव हा सण कोकणात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. गणेशोत्सवासाठी मुंबईतील चाकरमानी हा मोठ्या प्रमाणात आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वे, एसटी बसेस तसेच खाजगी वाहनांचा वापर करतो. येत्या गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य तसेच कोकण रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेच्या फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने आगाऊ बुकींग 60 दिवस आधीच सुरु केले आहे. या गाड्यांसह एलटीटी-रत्नागिरी, सावंतवाडी आणि मडगाव या मार्गांवरही साप्ताहिक आणि द्विसाप्ताहिक गाड्या चालवण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवासाठी धावणार 'या' रेल्वेच्या विशेष गाड्या
1. एलटीटी-सावंतवाडी ही विशेष गाडी 11 ते 28 सप्टेंबरदरम्यान सकाळी ८.२० वाजता सुटणार असून रात्री ९ वाजता सावंतवाडीला पोहोचेल. या गाडीसाठी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी आणि कणकवली येथे थांबे देण्यात आले आहेत.
2. 11 ते 27 सप्टेंबरदरम्यान सीएसएमटी-सावंतवाडी विशेष गाडी सीएसएमटीहून दुपारी 3.30 वाजता सुटेल तर पहाटे 4 वाजता पोहचेल. या गाडीला दादर, पनवेल, ठाणे, रोहा, चिपळूण, रत्नागिरी आणि कुडाळ येथे थांबे देण्यात आले आहेत.
3. दिवा-खेड मेमू विशेष गाडी 11 ते 28 सप्टेंबरदरम्यान ही गाडी दिवा येथून सकाळी 7.15 वाजता सुटेल तर दुपारी 2.35 वाजता ही गाडी खेड स्थानकावर पोहचेल. ही मेमू विशेष गाडी निळजे, तळोजा, कळंबोली, पनवेल, पेण आणि माणगाव या स्थानकांवर थांबेल.
4. दिवा-चिपळूण विशेष गाडी 11 ते 28 सप्टेंबरदरम्यान ही गाडी दिवा येथून दुपारी 1.40 वाजता सुटेल तर रात्री 9.30 वाजता चिपळूण स्थानकावर पोहचेल. ही विशेष गाडी पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर आणि खेड या स्थानकांवर थांबेल.
5.पुणे-रत्नागिरी विशेष गाडी १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान पुण्याहून मध्यरात्री १२.२५ वाजता सुटेल तर सकाळी ११.५० वाजता रत्नागिरीला स्थानकावर पोहोचेल. चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण आणि पनवेल येथे या स्थानकांवर थांबेल.














